दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । सातारा । लोणंद नगरपंचायतीच्या मासीक बैठकीत माळी समाजाबद्दल नगरसेवक आनंदराव शेळके यांनी अपशब्द वापरून समाजभावना दुखावल्याबद्दल त्यांच्याविरोधात माळी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन जाहीर निषेध करण्यात आला. लोणंद येथील श्री म्हस्कोबानाथ मंदिरापासुन जेष्ठ नेते एन. डी. क्षीरसागर, नगरसेवक रविंद्र क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली माळी समाजाचा निषेध मोर्चा नगरपंचायत पटागंणावर आणण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके, नगरसेवक भरतसाहेब शेळके, माजी नगराध्यक्ष सचिन शेळके, सागर शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सागर गालिंदे, ॲड. गणेश शेळके, असगर इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनिल कुदळे, नारायण क्षीरसागर सुनिल क्षीरसागर यांची भाषणे झाली. मोर्चाचे वतीने लोणंद नगरपंचायत आणि लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांना सुद्धा निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देण्यात आले.
यावेळी रविंद्र क्षीरसागर, शंकरराव क्षीरसागर, नारायण क्षीरसागर, भिकु रासकर, दिलीप क्षीरसागर, जयेश कुदळे, नामदेव क्षीरसागर, गणेश क्षीरसागर, पोपट राऊतआदी मान्यवरांसह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, लोणंद नगरपंचायतीच्या सभागृहात मासिक मिटींगच्या वेळी स्वीकृत नगरसेवक आनंदराव शेळके यांनी घनकचरा प्रकल्प जागेबाबत चर्चा सुरु असताना माळी समाजाने आयुष्यात एक तरी चांगले काम करा, असे उपहासात्मक बोलून माळी समाजाची अवहेलना केली. वस्तुत: माळी समाजाने वेळोवेळी शासकीय प्रकल्पांसाठी आपल्या शेतजमिनी विकासकामांसाठी देवून नेहमीच लोणंदच्या विकासात अग्रेसर अशी भूमिका पार पाडली असून तुम्ही समाजाबाबत अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करून माळी समाज आणि जातीवर हा विषय आणू नका, अशी विनंती बांधकाम सभापती रविंद्र क्षीरसागर यांनी केली. लोणंद नगरीला सामाजिक सलोखा व सामाजिक ऐक्य राखण्याची परंपरा आहे. अशा वातावरणात सामाजिक वातावरण दुषित करणारी सदरील घटना अतिशय निंदनीय आहे. ह्या गोष्टीचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून माळी समाजाविषयी अपशब्द वापरून समाजभावना दुखावल्याबद्दल स्वीकृत नगरसेवक आनंदराव शेळके यांचा जाहीर निषेध करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.