कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी – कामगारमंत्री हसन मुश्रीफ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । मुंबई । राज्याच्या विकासात कामगार महत्त्वाचा वाटा देत असतात. त्यामुळे राज्यातील संघटित आणि असंघटित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  कामगारांच्या हक्कांचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कामगार आयुक्तालय येथे कामगार आयुक्तालय स्थापनेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून आयुक्तालयामार्फत तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी  कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता वेद-सिंघल, कामगार आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, कामगार सह आयुक्त शिरीन लोखंडे यांच्यासह कामगार आयुक्तालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

कामगारमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ‍ब्रिटीश काळात कामगारांच्या हक्कासाठी अनेक कायदे अमलात आणले गेले. देशाच्या जडणघडणीत कामगारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. येणाऱ्या काळात कामगार विभागामार्फत कामगारांचे हित जोपासण्याला प्राधान्य देण्यात येईल.कामगार आयुक्तालय १९२१ मध्ये स्थापन करण्यात आले होते. यावर्षी त्याचे शताब्दी वर्ष आहे. याच निमित्ताने कामगार आयुक्तालयामार्फत बोधचिन्ह तयार करण्यात आले  असून याबाबत आपल्याला आनंद होत आहे.

यावेळी बालकामगार म्हणून काम करत असलेल्या मुलांनी ते काम सोडून देत पुन्हा एकदा शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केलेल्या ७ मुलांचा सत्कार कामगारमंत्री श्री.  मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!