
स्थैर्य, सातारा, दि. 12 : सातारा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शुक्रवारी नगरपरिषद संचालनाय वरळी मुंबई येथे पाठवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती पालिका सुत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी याप्रकरणातील सहभागी आरोपी राजेंद्र कायगुडे, गणेश टोपे प्रवीण यादव या तिघांचा निलंबनचा आदेशकाढल्याने पालिका वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली. फरार कायगुडे यांच्या निवास्थानी ही ऑर्डर पोस्टाने पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, संचित धुमाळ, टोपे आणि यादव यांना जिल्हा सत्र न्यायालयाने दुपारी अडीच वाजता जामीन मंजूर केला. या जामिनात अटीशर्तीप्रमाणे त्यांना तपासकार्यात पोलिसांना सहकार्य करावयाचे आहे.
सोमवार दि. 8 जून रोजी स्वच्छता ठेकेदाराला अनामत रक्कम परत देण्याच्या निमित्ताने सातारा पलिकेचे उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांना 2 लाख 30 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले होते. धुमाळ यांच्या दालनातच ही कारवाई झाली होती. या अनुषंगाने गणेश टोपे व प्रवीण यादव यांची नावे समोर आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुषमा चव्हाण यांनी या प्रकरणातील शेवटचा सुत्रधार हाती लागे पर्यंत प्रत्येकाची चौकशी करण्यात येणार असल्याची स्पष्ट संकेत दिले आहेत. या चौकशीत कोणाकोणाची नावे समोव येणार या भितीने भल्याभल्यांची झोप उडाली आहे.
या प्रकरणातील शातीर दिमाग राजेंद्र कायगुडे हा बेपत्ता झाल्याने या प्रकरणावर अजुनही म्हणावा असा प्रकाश पडलेला नाही. मात्र, एसीबीच्या ताब्यात जी ऑडिओ क्लीप उपलब्ध आहे, त्यात मुख्याधिकारी, लेखापाल यांच्या नावाचा उल्लेख असल्याने त्यांच्याकडे विषयीसुद्धा संशयाचे वातावरण कायम आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे व आरोग्य निरीक्षक कायगुडे यांचे मधूर संबंध सर्वश्रुत होते. मुख्याधिकारी यांनी याप्रकरणात कितीही हात झटकण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्याकडे संशयाची सुई फिरते आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याप्रकरणी किती सक्षमपणे तपास करणार हे महत्त्वाचे आहे.