दैनिक स्थैर्य । दि. ९ जुलै २०२१ । सातारा । कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारण्याबाबत पोलीस विभागाने विविध विभागांशी समन्वय साधून येत्या 15 दिवसात प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी कोयनानगर येथील प्रस्तावीत जागा मागणीच्या अनुषंगाने आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी सूचना केल्या. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आदी उपस्थित होते.
कोयनानगर येथे राज्य आपत्ती बचाव दल आणि पोलीस प्रशिक्षण उपकेंद्रासाठी जी जमिन घेण्यात येणार आहे, त्याची प्राधान्याने मोजणी करावी. यामध्ये डोंगरी भाग व सपाट भाग किती आहे याची माहिती प्रस्तावात द्यावी. जागेचा झोन तपासावा तसेच जागा मागणीचा प्रस्ताव विहित नमुन्यात प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत दिल्या.