स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१३: निवडणूक आयोग
मतदारांना डिजिटल पद्धतीची ओळखपत्रे जारी करण्याबाबत विचार करीत असून ही
मतदार ओळखपत्रे डिजिटल रूपात असल्यास ती चटकन वापरता येऊ शकतात, असे वरिष्ठ
अधिका-यांचे मत आहे. याबाबत निवडणूक आयोगाने अद्याप कुठलाही निर्णय मात्र
घेतलेला नाही.
याबाबत निवडणूक आयोगातील एका अधिका-याने
सांगितले की, आम्हाला प्रत्यक्ष मतदानाच्या ठिकाणी काम करणा-या लोकांकडून
सूचना मिळत आहेत. राज्य निवडणूक अधिका-यांचा एक कार्यकारी गट असून
त्यांच्या मार्फत व थेट लोकांकडूनही सूचना मिळत असतात. त्यात अनेकांनी
मतदार ओळखपत्र डिजिटल स्वरूपात द्यावे, अशी सूचना केली आहे.
डिजिटल मतदान ओळखपत्र मतदार मोबाइलमध्ये
बाळगू शकतात काय या प्रश्नावर त्यांनी सांगितले, की एकदा निवडणूक आयोगाने
डिजिटल मतदार ओळखपत्रांचा निर्णय घेतल्यानंतर ती पुढची पायरी असू शकते.
हे ओळखपत्र मोबाइलवर, संकेतस्थळावर,
ई-मेलरूपात ठेवता येणारे किंवा मुद्रित स्वरूपात मतदानावेळी स्वत:जवळ
बाळगता येणारे अशा कुठल्याही प्रकारात आणता येईल. डिजिटल स्वरूपात
व्यक्तीचे छायाचित्रही स्पष्ट असेल. अन्य एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले
आहे, की तंत्रज्ञानाचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेताना सुरक्षेचा
विचार करावा लागेल.