दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । नागपूर । राज्यात प्रथम जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने जिल्ह्यात तीन दिवसीय विभागीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मेळाव्याला गणमान्य सेलिब्रिटी येणार आहेत. त्याबरोबरच जिल्ह्यात सात हजार महिला बचत गट आहेत. त्यानुषंगाने या मेळाव्याचे योग्य नियोजन करा, अशा सूचना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी दिल्या.
या मेळाव्याची रुपरेषा ठरविण्यासाठी शहरातील रवी भवन येथे पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी आर. विमला, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा परिषदेचे कृषी व पशसंवर्धन सभापती तापेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकूरवाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विवेक इलमे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. केदार पुढे म्हणाले की, या मेळाव्यात मार्गदर्शनासाठी दिल्लीचे मानांकित बचत गटाचे प्रतिनिधी येणार असून महिला बचत गटांना ऑनलॉईन मार्केटींग, मेट्रो स्टेशन मॅनेजमेंट, फुड मॅनेजमेंट आदिबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रशिक्षण सत्राचे आयोजन करुन महिला बचत गटाचे सक्षमीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी आर. विमला यांना महिला मेळाव्याच्या आयोजनाबाबत मोठा अनुभव असून महिला क्षेत्रात त्यांचे मोलाचे स्थान आहे. या त्यांच्या अनुभवाचा लाभ घेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यातील निवडक 150 गटांना विशेषत: प्राविण्य गटात घेऊन व्यवसाय व्यवस्थापनाचे घडे त्यांना देण्यात येणार आहे. या मेळाव्यात सर्व खाद्यांनापासून सर्व प्रकारचे स्टॉल राहणार असून 13 तालुक्यातून सुमारे 10 हजार बचत गटाच्या महिला येणार आहे. त्यांना कार्यक्रमस्थळी येण्यासाठी जिल्हा परिषदेद्वारे वाहन व्यवस्था, भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. महिला प्रॉडक्टला प्राधान्य या मेळाव्यात राहणार असून मोठी आर्थिक उलाढाल महिला जगतात होणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी सहकार्याच्या भावनेतून काम करावे, असेही ते म्हणाले.
या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.