अधिकार्यांना मार्गदर्शन करताना शेखर सिंह, शेजारी सुनील थोरवे, विजयकुमार राऊत व अधिकारी. |
टोळधाड किडीच्या प्रतिबंधासाठी शेतकर्यांनी सामूहिक प्रयत्न करा
स्थैर्य, सातारा, दि. 4 : जिल्ह्यातील शेतकर्यांच्या शेतात पूर्वमशागतीच्या कामांना वेग आला असून खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्यात आली असून खते व बियाणांच्या वाटपाचे योग्य नियोजन करावे तसेच टोळधाड या किडीच्या प्रतिबंधासाठी शेतकर्यांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी कृषी विभागाने टोळधाड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती प्रत्येक शेतकर्यापर्यंत पोहचवली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
सातारा जिल्हा खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
खरीप 2020 साठी 102923 मे.टन एवढ्या खतांचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी माहे मे 2020 अखेर पुरवठा 30300 मे. टन इतका झाला आहे. मागील शिल्लक मिळून एकूण उपलब्धता 59943 मे.टन इतकी आहे.
1 एप्रिल 2020 पासूनची विक्री 47173 मे.टन इतकी आहे. सद्यस्थितीत 25857.74 मे.टन इतका खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिया-5267 मे.टन, डीएपी-3819 मे.टन, एमओपी-2598 मे.टन, एसएसपी-1027.2 मे.टन, एनपीके-13144 मे.टन उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीमध्ये युरियासाठी मागणी तुलनेने जास्त प्रमाणात आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यास 3700 मे.टन युरिया उपलब्ध होणार आहे व जूनच्या दुसर्या आठवड्यात 3000 मे.टन युरिया उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत युरिया व इतर सर्व खतांचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध असून जिल्ह्यातील शेतकर्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
टोळधाड किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास एच.टी.पी. पंपाद्वारे किंवा फायरब्रिगेड यंत्रणेमार्फत कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा प्रशासनामार्फत सज्ज ठेवण्यात आली आहे, असेही प्रभारी जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी राऊत यांनी या बैठकीत सांगितले.