कोविड लसीकरणाचे योग्य नियोजन करा पालकसचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांच्या सूचना सोलापूर जिल्ह्याचा घेतला आढावा


स्थैर्य, सोलापूर,दि.८: राज्यात कोरोना लस देण्याची तयारी सुरू असून सोलापूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार लसीकरणाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणूगोपाल रेड्डी यांनी दिल्या.

व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून श्री. रेड्डी यांनी आज सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, माता व बाल संगोपन अधिकारी तथा कोरोना लसीचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक बी.टी. यशवंते यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. रेड्डी यांनी जिल्ह्यातील कोविड, लसीकरण तयारी, केंद्र व राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना, रोजगार हमी, स्वयंरोजगार, उद्योग, विमानतळ याबाबत सविस्तर आढावा घेतला.

श्री. रेड्डी म्हणाले, आरटीपीसीआर चाचण्या वाढवून कोरोनामुळे होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील रहा. लसीकरणाचे सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक रूग्णांची योग्य काळजी घ्या. रब्बी पीक कर्जासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीकडे (एसएलबीसी) पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात गुंतवणूक वाढण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. यासाठी गुंतवणूकदारांच्या बैठका घेऊन त्यांना महत्व पटवून द्या. स्वयंरोजगाराचा वेळोवेळी आढावा घ्या. औद्योगिक विकास, उद्योग वाढीसाठी विमानतळाचा विषय महत्वाचा आहे. शहरातील विमानतळाच्या शेजारील कारखान्याच्या चिमणीचा विषय त्वरित मार्गी लावा. सुसज्ज विमानतळ असेल तर गुंतवणूकदार, उद्योगपती याठिकाणी येतील. जिल्ह्यातील प्रत्येक विषयाची संक्षिप्त फाईल माझ्याकडे पाठवा, शासन दरबारी प्रयत्न करून विषय मार्गी लावू. आयटी पार्कसाठीही शासन दरबारी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

श्री. रेड्डी यांनी प्रत्येकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

श्री. शंभरकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाविषयक आणि लसीकरणाच्या तयारीबाबत माहिती दिली. आतापर्यंत जिल्ह्यात 49 हजार 599 कोरोनाचे रूग्ण आढळून आले, यापैकी 1740 रूग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूदर 3.3 टक्के असून कमी करण्यास यश आले आहे. सध्या 738 रूग्ण उपचाराधिन असून 94 टक्के रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या चाचण्या सुरू असून आता आरटीपीसीआर चाचण्या वाढविणार आहोत.

जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार चाचण्या होत नाहीत. लॅबची संख्या कमी पडत असल्याने खाजगी तीन लॅबची मदत घेण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात रोज 1500 चाचण्या होतील अशी मशिन खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रूग्णसंख्या कमी होत असल्याने 25 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलपैकी चार सुरू आहेत. जिल्ह्यात चार ठिकाणी लसीकरणाचा ड्राय रन पार पडला. लसीकरण करताना येणाऱ्या अडचणींचे वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत निरीक्षण केले, त्यानुसार प्रत्यक्ष लसीकरण करताना योग्य नियोजन करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 जणांना कोरोनाची लस देणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतर, बालके आणि महिला हॉस्पिटलच्या निधीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती त्यांनी केली.

श्री. शिवशंकर यांनी सांगितले की, शहरात चाचण्या वाढवून मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या 28 हॉस्पिटलमध्ये कोविडचे बेड रिकामे आहेत. शहरातील उड्डाण पूलासाठी भूसंपादन प्रक्रिया आणि अंतर्गत गटाराची कामे याबाबत निधीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली.

श्री. स्वामी यांनी जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि महाआवास योजनांची माहिती दिली. जिल्ह्यात 28 हजार घरांचे उद्दिष्ट असून 10 हजार 58 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. 31 मार्चपर्यंत घरांचे काम पूर्ण  करणार आहे. जलजीवन मिशनद्वारे एक लाख तीन हजार घरांना नळाद्वारे पाणी दिले. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून जिल्ह्यात 9 ते 12 वीच्या 95 टक्के शाळा 13 नोव्हेंबरपासून सुरू असून 60 टक्के विद्यार्थी येत आहेत. पाचवी ते 8 वीच्या शाळा 12 जानेवारीनंतर सुरू करण्यासाठी पूर्व तयारी सुरू असल्याची माहिती श्री. स्वामी यांनी दिली.

श्री. यशवंते यांनी उद्योग कर्जाबाबत माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!