दैनिक स्थैर्य | दि. 28 डिसेंबर 2024 | फलटण | गुणवरे तालुक्यातील फलटण येथील कै. संजय गांधी विद्यालयात सिद्धिविनायक सहकारी रुग्णालय, गोखळी व सक्षम स्री शक्ती आसू यांचे संयुक्त वतीने आयोजित आरोग्य जागृती व प्रतिबंध व उपाय शिबिर पार पडले. या शिबिरात श्रीमंत डॉ. संयुक्ताराजे धिरेंद्रराजे खर्डेकर यांनी विद्यार्थिनींना आरोग्याच्या महत्त्वपूर्ण पैलूवर मार्गदर्शन केले.
व्यायामाचे महत्त्व अनन्यसाधारण असून भविष्यातील पिढी निरोगी आणि सुदृढ असली पाहिजे, असे डॉ. खर्डेकर यांनी सांगितले. त्यांनी योग्य व्यायाम, सकस आहार आणि पुरेशी विश्रांती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन केले. आजार झाल्यावर इलाज करण्यापेक्षा तो होणारच नाही याची काळजी घ्यावी, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी ‘प्रिव्हेंशन इज बेटर दैन क्योर’ या सूत्राचा संदर्भ दिला.
डॉ. खर्डेकर पुढे म्हणाल्या की, मोबाईलचे व्यसन युवकांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत आहे. रुग्णालय, वाचनालय, देवालय, विद्यालय यापैकी काय टाळायला हवे असा प्रश्न त्यांनी विचारला आणि मुलांनी एका सुरात रुग्णालय नको आरोग्य हवे असे सांगितले. मुलींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली आणि मासिक पाळी आणि त्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या शिबिरात आसू येथील महिला बचत गटांनी तयार केलेले इकोफ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन्स मोफत वितरित करण्यात आले. डॉ. खर्डेकर यांनी मुलींना अनेमिया म्हणजेच रक्त कमी असण्याच्या समस्येवर भर दिला आणि आवश्यक जीवनसत्वे, लोह, कॅल्शियमयुक्त आहार घेण्याची गरज सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आनंदराव जाधव सर होते, तर स्वागत श्रीमती अरुणा बोबडे मॅडम यांनी केले.