विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांचा प्रसार करून त्यांना प्रोत्साहन द्या – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | पुणे | विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या संशोधन प्रकल्पांना आणि त्यातून तयार केलेल्या उपकरणांना प्रसिद्धी देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न शैक्षणिक संकुलातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, संस्थेचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख आदी उपस्थित होते.

श्री.सामंत म्हणाले, विद्यार्थ्यांना तज्ज्ञ आणि विद्वान व्यक्तींचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासोबत आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न महाविद्यालयांनी करावा. प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी व्हावा हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे. हे धोरण विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे.

देशातील शिक्षण प्रगत झाल्याशिवाय उद्योगविश्व किंवा जगाचे लक्ष आपल्याकडे जाणार नाही. त्यामुळे देशातील आदर्श शिक्षण प्रणाली तीन टप्प्यात आणली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यमान पायाभूत सुविधांचा आधारे विद्यार्थ्याला पुढे नेण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. दुसऱ्या टप्प्यात शैक्षणिक संस्थामधील सुविधा अधिक उन्नत करणे आणि तिसऱ्या टप्प्यात शासन आणि संस्था मिळून नवे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.  या दिशेने वाटचाल करताना स्वायत्त संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिवाळीनंतर संस्थांच्या प्रतिनिधींची कुलगुरूंसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षणासोबत राज्याचा इतिहास व संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना होणे गरजेचे असून विद्यापीठांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आणि अनुभवाचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झालेला न्यूनगंड दूर करण्याचा महाविद्यालयांनी आणि पालकांनी प्रयत्न करावा, त्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही याची काळजी शासन घेईल, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने स्वातंत्र्यपूर्व काळात पुणे शहरात शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. या संस्थांनी शैक्षणिक विकासात चांगले योगदान मिळाले आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या युगातील आवश्यक सुविधांची निर्मिती मॉडर्न महाविद्यालयाने केली आहे. या सुविधांचा विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होईल. विद्यापीठाने उत्तम अभ्याक्रम उपलब्ध करून दिले असून विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करावा असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.एकबोटे यांनी यावेळी विचार व्यक्त केले. प्रास्ताविकात श्रीमती एकबोटे यांनी संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.

श्री.सामंत यांच्या हस्ते ‘ज्ञानमय’ या संशोधन साहित्याचे प्रकाशन करण्यात आले.

तत्पूर्वी श्री.सामंत यांच्या हस्ते संस्थेची नूतन इमारत, संगणक कक्ष आणि वर्गखोलीचे उदघाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून नावीन्यपूर्ण प्रकल्पांची माहिती घेतली.


Back to top button
Don`t copy text!