‘पुणे म्हाडा’ लॉटरीच्या माध्यमातून ‘सर्वांसाठी घर’ ध्येयपूर्तीकडे आश्वासक पाऊल – उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १३: ‘सर्वांसाठी घर’ हे शासनाचे धोरण असून ‘पुणे म्हाडा’ने आणलेली 2 हजार 890 घरांची लॉटरी हे त्या दिशेने पडलेले आश्वासक पाऊल आहे. ‘म्हाडा’ची लॉटरी योजना पूर्णपणे पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असून कुणाच्याही खोट्या आश्वासनाला व फसवणुकीला बळी पडू नका. स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी अधिकाधिक जणांनी ‘पुणे म्हाडा’च्या लॉटरी योजनेत अर्ज करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे (म्हाडाचा विभागीय घटक) यांच्या वतीने 2 हजार 890 सदनिकांच्या लॉटरी योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेचे ऑनलाईन उद्घाटन केले. कार्यक्रमाला गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर (सर्वजण ऑनलाईन पद्धतीने) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘म्हाडा’च्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना माफक दरात दर्जेदार व हक्काची घरे मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘म्हाडा’ची सोडत प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त आहे. त्यामुळे कुठल्याही आमिषाला किंवा फसवणुकीला बळी पडू नये. जर कुणी असा प्रयत्न केला तर त्याच्याविरुद्ध तक्रार करावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या, मराठी नववर्षाच्या तसेच उद्यापासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्याही शुभेच्छा दिल्या. राज्यावरील कोरोनाचे संकट लक्षात घेता सामजिक अंतर राखणे, हात वारंवार धुणे आणि मास्क वापरणे या त्रिसूत्रीचे तसेच ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!