दैनिक स्थैर्य । दि. २६ जून २०२२ । सातारा । गणेशोत्सव, नवरात्रौत्सव तसेच इतर सण, उत्सव अधिक पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे व्हावेत याकरिता केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने पी.ओ.पी. म्हणजेच प्लास्टर ऑफ पॅरिस हद्दपार होण्याचे दृष्टीने निर्गमित केलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी श्री गणेशोत्सवापासून करण्याबाबत निर्देशित केले आहे. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव तसेच इतर सण हे बहुतांश स्वरुपात सर्वसामान्य जनतेच्या घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यांत येत असल्यामुळे सातारा जिल्हयातील पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनविण्यांत येणाऱ्या मूर्तीची विक्री, उत्पादन, आणि वितरणावर सातारा जिल्ह्यामध्ये बंदी असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पारित केले आहेत.
जिल्हयातील मुर्तीकार यांचे प्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा, प्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, उप-प्रादेशिक अधिकारी प्रदुषण नियंत्रण मंडळ सातारा यांचे समवेत दिनांक २१/०६/२०२२ रोजी बैठक घेऊन केंद्रीय प्रदुषण मंडळाचे दिनांक १२ मे २०२० च्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मुर्तीपासून पर्यावरणास होणारा धोका लक्षात घेऊन सन २०२२ या वर्षीच्या श्री गणेशोत्सवापासून केंद्रीय प्रदुषण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सातारा जिल्हयामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सदरील आदेश पारित केले आहेत.
सातारा जिल्हयातील शहरी तसेच ग्रामीण भागांमधील जल आणि वायु प्रदुषणामध्ये वाढ होऊ नये याकरिता उपाययोजना करणे गरजेचे असलेने पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) चे वापरामुळे निसर्गामध्ये होणारे प्रदुषण आणि पर्यावरणामध्ये होणारे बदल व त्यापासून होणारा भविष्यातील धोका विचारात घेऊन केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनविणेत येणा-या सर्व प्रकारच्या मूर्ती उत्पादन, वितरण व विक्री रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील तरतुदीनुसार सातारा जिल्हयामध्ये पी.ओ. पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) पासून बनविणेत येणा-या सर्व प्रकारच्या मुर्ती उत्पादन, वितरण व खरेदी-विक्री करणेवर दि. ०६ जुलै २०२२ पासून बंदी घालण्यात येत आहे. ज्या मुर्तीकारांकडे पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मुर्ती असतील त्यांना दिनांक ०५ जुलै २०२२ पर्यंत त्याची विक्री करण्याची मुभा देण्यात येत आहे. पी. ओ. पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती बनविण्यांस वितरण करण्यांस, आयात करण्यांस दि. ०६ जुलै २०२२ पासून प्रतिबंध करण्यात येत असलेमुळे यानंतर पी. ओ. पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मुर्ती आढळून आल्यास मुर्ती जप्त करुन संबंधितांवर दंडनीय कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात पारित करण्यात आले आहे.