स्थैर्य, सातारा, दि. 01 : महाराष्ट्रामध्ये होलार समाज सुमारे 25 लाखाच्या आसपास आहे. अतिशय दुर्लक्षित व वंचित राहिलेला आहे. आजपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा सरकारने या समाजाची दखल घेतलेली नाही. समाजाने कधीही जातीयवादी पक्षाच्या जवळ किंवा जातीयवादी पक्षांना कधीही मदत केली नाही. अशा या पुरोगामी विचारांनी चालणार्या समाजाची आपण दखल घ्यावी, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्यावतीने खा. शरद पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे सहसचिव राजाभाऊ माने व संघटनेचे तालुकाध्यक्ष लालासाहेब आवटे व तालुका उपाध्यक्ष परशुराम खांडेकर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे, महाराष्ट्रामध्ये मातंग आयोगाच्या धर्तीवर होलार समाजासाठी स्वतंत्र आयोगाची निर्मिती करण्यात यावी व या आयोगावरती होलार समाजाचा प्रतिनिधी घ्यावा. महाराष्ट्रामध्ये होलार समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र होलार समाज आर्थिक विकास महामंडळाची नियुक्ती करावी किंवा चर्मकार विकास महामंडळावरती आमच्या होलार समाजाचा अध्यक्ष नेमण्यात यावा. एस. सी. मागासवर्गीयांसाठी असलेल्या 13 टक्के आरक्षणची अ, ब, क, ड कडून होलार समाजासाठी 5 टक्के आरक्षण मिळावे. महाराष्ट्रामध्ये होलार समाजाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व नगरपालिका अशा सर्व ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून घ्यावा. विविध शासकीय कमिट्या व महामंडळ, सातारा जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध शासकीय कमिट्यांवर होलार समाजातील कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात यावी. होलार समाजामध्ये अनेक तरुण हे कलाकार असून होलार समाजामध्ये वंशपरंपरेने वाद्य वाजविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे समाजातील एक प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलाकार मानधन कमिटीवर नेमणूक करावा, अशा विविध मागण्या करण्यातआल्या आहेत.