
दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । फलटण । फडतरवाडी, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी कल्याण काटे यांनी सोयाबीन पीक ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत सातारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 4500 शेतकरी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
सोयाबीन पीक ऑनलाइन कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकर्यांना या पिकाविषयी माहिती देवून मार्गदर्शन केल्यानंतर आयोजित स्पर्धा परीक्षेत पेरणी पासून कापणीपर्यंत योग्य पद्धत संदर्भात प्रश्न या ऑनलाइन कार्यशाळेत विचारण्यात आले होते. बरोबर उत्तरे देणारे शेतकर्यांना प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचा मान कल्याण काटे यांनी मिळवला.
अमीर खान, किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ यांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून जसे शेतीच्या पाण्यासाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केले, त्याच पद्धतीने सोयाबीन या नगदी पिकासाठी काम करण्याचा निर्णय पाणी फाउंडेशन टीमने केल्यानंतर महाराष्ट्र शासन, कृषी विद्यापीठे यांच्या सहकार्याने सोयाबीन पीकाविषयी शेतकर्यांमध्ये जनजागृती करुन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, व्याख्याने, चर्चा, प्रश्नोत्तरे अशा प्रकारे काम सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून सदरची स्पर्धा घेण्यात आली होती.