
प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल आणि लायन्स क्लब फलटण गोल्डनचा संयुक्त उपक्रम; तीन दिवसीय शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
स्थैर्य, फलटण, दि. ३० डिसेंबर : “विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात प्राणायाम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य आहाराची सवय लावून घेतल्यास त्यांचे जीवन आनंदी आणि तणावमुक्त होईल. आई-वडिलांचा आदर आणि संवाद कौशल्य यामुळे व्यक्तिमत्त्व घडते,” असे प्रतिपादन अहिल्यानगरचे निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुरेश बेदमुथा यांनी केले.
सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (कोळकी) आणि लायन्स क्लब ऑफ फलटण गोल्डन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ प्रणित तीन दिवसीय ‘प्रज्ञा योग’ (Intuition Process) शिबिरात ते मार्गदर्शन करत होते.
विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि भावनिक विकासासाठी आयोजित या शिबिरात वयोगटानुसार दोन सत्रे घेण्यात आली:
-
८ ते १३ वर्षे वयोगट: ‘उत्कर्ष योग’
-
१४ ते १८ वर्षे वयोगट: ‘मेधा योग’
या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना एकाग्रता वाढवणे, आत्मविश्वास निर्माण करणे, अंतर्ज्ञान जागृत करणे आणि तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचे धडे देण्यात आले.
शिबिराच्या समारोप प्रसंगी निवृत्त प्राचार्य रविंद्र येवले, सरस्वती शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका व लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या अध्यक्षा ला. सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य सौ. सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका सौ. अहिल्या कवितके, सौ. माधुरी माने यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिबिराचा सकारात्मक परिणाम
सुरेश बेदमुथा यांनी विद्यार्थ्यांना संस्कार आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले. शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचारसरणी, स्मरणशक्ती, एकसंघता आणि आत्मशिस्त वाढीस लागल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले.

