‘प्रोग्रेसिव्ह’मध्ये दुहेरी उत्सव; समाजमन घडविणाऱ्या पत्रकारांचा सन्मान अन् विद्यार्थ्यांचा ‘क्रीडा जल्लोष’! खाशाबा जाधवांच्या स्मृतीस अनोखे अभिवादन


कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलमध्ये राज्य क्रीडा दिन आणि पत्रकार दिन उत्साहात साजरा. लायन्स क्लब फलटण गोल्डनच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांचा गौरव. क्रीडा संस्कृती आणि सामाजिक बांधीलकीचा अनोखा संगम. वाचा सविस्तर…

स्थैर्य, कोळकी, दि. १९ जानेवारी : विद्यार्थ्यांमध्ये खिलाडूवृत्ती आणि क्रीडा संस्कृती रुजविणे तसेच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांचा यथोचित सन्मान करणे, अशा दुहेरी उद्देशाने कोळकी (ता. फलटण) येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित ‘प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज’मध्ये एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे आणि राज्य क्रीडा दिनाचे औचित्य साधून आयोजित या वार्षिक क्रीडा संमेलनात क्रीडा आणि पत्रकारितेचा अनोखा संगम पाहायला मिळाला.

हा कार्यक्रम प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि ‘लायन्स क्लब फलटण गोल्डन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.

महापुरूषांच्या प्रतिमा पूजनाने सुरुवात

कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात सरस्वती पूजनाने तसेच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीताने उपस्थित मान्यवर व पत्रकारांचे मन जिंकले. संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड व प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड यांनी मान्यवरांचा रोप देऊन सत्कार केला.

लेखणीच्या शिलेदारांचा गौरव

या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे विविध माध्यमांतून समाजप्रबोधन करणाऱ्या पत्रकारांचा झालेला सन्मान. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता, प्रसन्न रुद्रभटे, नासिर शिकलगार, सतीश कर्वे, युवराज पवार, संजय जामदार, पोपट मिंड, विकास शिंदे, किरण बोळे, अजय माळवे, वैभव गावडे, राजकुमार गोफणे, सागर चव्हाण, प्रशांत सोनवणे आणि अमोल पवार या पत्रकारांचा ‘पुस्तक आणि वृक्ष’ देऊन गौरव करण्यात आला. ज्ञानाचे प्रतीक असलेले पुस्तक आणि पर्यावरणाचे रक्षण करणारा वृक्ष देऊन केलेला हा सत्कार उपस्थितांच्या कौतुकाचा विषय ठरला.

पत्रकारांची भूमिका मोलाची : सौ. संध्या गायकवाड

यावेळी बोलताना संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी मकरसंक्रांती, भूगोल दिन, पत्रकार दिन व राज्य क्रीडा दिन या सर्वांचा धागा पकडत महत्त्व विशद केले. त्या म्हणाल्या, “समाज घडविण्यात शिक्षकांप्रमाणेच पत्रकारांची भूमिकाही अत्यंत मोलाची आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम शाळेत राबवणे गरजेचे आहे.”

खेळाने जीवनमूल्यांचा विकास : महेश खुटाळे

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक व तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले. “केवळ शरीराचा व्यायाम नव्हे, तर खेळामुळे शिस्त, संघभावना आणि जीवनमूल्यांचा विकास होतो. विद्यार्थ्यांनी मैदानावर घाम गाळला तरच उद्याचे सुदृढ नागरिक घडतील,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांना मौलिक सल्ला ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता यांनी आपल्या भाषणात मराठी पत्रकार दिनाचा इतिहास आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांनी खेळ आणि शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रगती साधावी, असे आवाहन केले.

या सोहळ्यास लायन्स क्लब सातारा रिजनचे झोन चेअरमन लायन जगदीश करवा, एम.जे.एफ. लायन मंगेश दोशी, लायन सुहास निकम, लायन रणजित निंबाळकर, लायन उज्वला निंबाळकर, लायन सुनिता निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक महेंद्र कातुरे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्या सौ. सुजाता गायकवाड, समन्वयिका अहिल्या कवितके, माधुरी माने, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!