दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
कोळकी, ता. फलटण येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा १६ वा वर्धापनदिन व संस्थेचेे आधारस्तंभ श्री. पांडुरंग पवार (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनीं स्वागतगीत गायले व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्रमुख अतिथी मुधोजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अनिल टिके यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलन झाले. प्रास्ताविकानंतर श्री. पांडुरग पवार (भाऊ) यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संस्था व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये पूर्व प्राथमिक विभागातून सौ. शितल कदम, प्राथमिक विभागातून सौ. सुप्रिया बनसोडे, माध्यमिक विभागातून सौ. अमृता गोसावी यांना बेस्ट टिचर अॅवॉर्ड तसेच प्राथमिक विभागातून शर्मिली काशिद आणि सायली शिंदे, माध्य. विभागातून सौ. सपना बोराटे यांना बेस्ट डेब्यूट् टिचर अॅवॉर्ड, ग्रंथपाल श्री. प्रशांत सोनवणे यांना बेस्ट परफॉर्मन्स अॅवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रशालेचे सेवक श्री. आनंदराव शिंदे यांचाही उत्कृष्ट सेवेबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे डॉ. अनिल टिके सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेच्या मागील १५ वर्षांतील गुणवत्तापूर्ण व उल्लेखनिय यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संस्थेच्या पदाधिकार्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून भारतीय संस्कृती व संस्कारमूल्ये यांची रुजवणूक करण्यास प्रोग्रेसिव्हच्या शिक्षकांचे सातत्यपूर्ण योगदान प्रशंसनीय आहे. देशाच्या प्रगतीसाठी आदर्श व सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रोग्रेसिव्ह नेहमीच अग्रेसर असेल, असे मत व्यक्त करून शिक्षकांनाही बहुमोल मार्गदर्शन केले.
संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड यांनीही आपल्या मनोगतात संस्थेच्या मागील १५ वर्षांतील यशस्वी वाटचालीचा आणि त्यामध्ये असणारे भाऊंचे योगदान याचाही विशेष उल्लेख करत आढावा घेतला. विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रातील उज्ज्वल यश व शिक्षकांच्या भरीव योगदानाचे कौतुक करून सहकार्याबद्दल पालकांचे विशेष आभार मानून सर्वांना वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. प्राचार्य अमित सस्ते यांनीही प्रास्ताविकामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण उपक्रम राबविण्यास प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
याबरोबरच संस्थापक श्री. भिमराव माने, अध्यक्ष श्री. प्रदिप माने, सचिव श्री. विशाल पवार, श्री. विकास गायकवाड, कोषाध्यक्षा सौ. सविता माने, सौ. प्रियांका पवार यांनीही सर्वांचे अभिनंदन करून वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिक्षकांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी सौ. सुलोचना पवार, प्रथमेश गायकवाड, अनय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीसह पर्यवेक्षिका सौ. माधुरी काटकर, समन्वयिका सौ.सुवर्णा निकम आणि योगिता सस्ते यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ. रोहिणी ढालपे आणि सौ. रेश्मा कदम यांनी केले तर आभार श्री. रोहन घाडगे यांनी मानले.