दैनिक स्थैर्य । दि. १० सप्टेंबर २०२२ । फलटण । दि यशवंत को-ऑप. बँकेची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा प. पु. उपळेकर महाराज समाधी मंदिर, फलटण या सभागृहात संपन्न झाली. त्यावेळी बोलत असताना बँकेचे अध्यक्ष मा.शेखर चरेगांवकर यांनी वरील उद्गार व्यक्त केले. सभेस बहुसंख्य सभासद उपस्थित होते.
कोरोना संपला असला तरी कोरोना कालावधीत उद्योग व्यवसायांचे झालेले नुकसान भरून काढण्याकरीता अजून २ ते ३ वर्षाचा कालावधी लागेल. व्यवसाय, शेती, उद्योग सुरू झाले असले तरी मागील ३ वर्षात जे नुकसान झाले आहे, ते भरून काढण्यासाठी बँकांनी कर्जदारांच्या मागे उभे राहून त्यांना सहकार्य केले पाहिजे. त्यासाठी बँकेने या आर्थिक वर्षाअखेर १६० कोटी ३५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करून उद्योग, व्यवसाय, शेती यास उभारणी देण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योग, व्यवसाय, शेती यासमोर असलेल्या समस्यांमुळे सध्या बँकांची नफा क्षमता कमी होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सभासदांनी डिव्हीडंडचा आग्रह न धरता बँकेच्या निधी सक्षमीकरणासाठी सहकार्य केले पाहिजे असेही त्यांनी म्हंटले.
सध्या आर्थिक क्षेत्र पूर्वपदावर येण्यासाठी काही विलंब लागत असला तरी दि यशवंत बँकेची झालेली वसुल भागभांडवलाची वाढ ५५ लाख ६२ हजार, ठेवीमध्ये झालेली वाढ ११ कोटी ५६ लाख, कर्जामध्ये झालेली वाढ १६ कोटी १२ लाख, नफ्यामध्ये झालेली वाढ ४५ लाख ६५ हजार अशी वाढ करत बँकेने ३५० कोटीचा एकत्रित व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. लेखापरीक्षणात सातत्याने १२ वर्षे मिळालेला अ वर्ग’ हे केवळ सभासदांनी बँकेच्या व्यवस्थापनावर दाखविलेल्या विश्वासामुळे शक्य झाले आहे असे त्यांनी सांगितले.
बँकेच्या नुकत्याच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक बिनविरोध निवडणूकीत सर्व उपस्थित संचालकांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला व त्यांचे सर्व सभासदांनी उत्साहात स्वागत केले.
यावेळी अध्यक्ष शेखर चरेगांवकर, उपाध्यक्ष अजित निकम, संचालक नानासाहेब पवार, प्रा.श्रीकृष्ण जोशी, गोपीनाथ कुलकर्णी, संदीप इंगळे, जयवंत जगदाळे, महेशकुमार जाधव, डॉ. प्रदीप शिंदे, डॉ. सचिन साळुंखे, सुहास हिरेमठ, परशराम जंगाणी, सौ. कल्पना गुणे, सी.ए. प्रियेश खिरड उपस्थित होते.
विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन बँकेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौ. वैशाली मोकाशी यांनी केले व सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
बँकेचे उपाध्यक्ष अजित निकम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.