
दैनिक स्थैर्य । 8 मे 2025। सातारा । रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 66 व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्यावतीने शुक्रवारी (दि. 9) सकाळी 8.30 वाजता कर्मवीर समाधी परिसरात आयोजित करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, संस्थेचे लाइफ मेंबर, लाइफ वर्कर, हितचिंतक, पदाधिकारी, शाखाप्रमुखांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून, संस्थेला शैक्षणिक आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी देणगी रूपाने विशेष योगदान देणार्या मान्यवरांचा शरद पवार यांच्या हस्ते पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या मॅनेजिंग ट्रस्टी खासदार सौ. सुप्रिया सुळे, रामशेठ ठाकूर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर, श्रीमती मनीषा जाधव, राजेंद्र आप्पासाहेब पवार, प्रतापराव गोविंदराव पवार, अॅड. अशोक बोरा, डॉ. शिवाजीराव कदम, शुभांगी घरत व महेंद्रशेठ घरत, हणमंत शिवदास ठिगळे या मान्यवरांचा सत्कार होणार आहे.
त्याचबरोबर संस्थेच्या विविध शाखांमध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक विकास करून, समाजाच्या विकासामध्ये योगदान देणार्या संस्थेच्या विविध शाखांना ’कर्मवीर’ पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. माध्यमिक आणि महाविद्यालय स्तरावर शैक्षणिक, सामाजिक, संशोधनात्मक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणार्या प्राध्यापक व शिक्षकांना ’यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचाही सत्कार होईल. कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.