दैनिक स्थैर्य । दि. ०६ जून २०२३ । सातारा । छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या आवारात स्वराज्य गुढी उभारून शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते स्वराज्य गुढीचे पूजन करुन श्रीफळ वाढवून गुढी उभारण्यात आली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीस पोवई नाका येथील शिवतिर्थ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आवारात गुढी उभारण्यात आली. गुढी उभारल्यानंतर राष्ट्रगीताचे व महाराष्ट्र राज्यगीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे घोषवाक्य व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करण्यात आला.