दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
मुधोजी महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. प्रभाकर पवार यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्तुत्य सत्कार केला. प्रो. पवार हे मुधोजी महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख असून श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे संचालक आहेत.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय १९५७ पासून फलटण व परिसरातील विद्यार्थ्यांना तसेच माण, खटाव येथील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून घडवण्याचे काम अखंडपणे करीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी आपल्या अमोघ वाणीने विवेकानंद स्मृती स्मारकासाठी अखंडपणे व्याख्याने दिली. या महाविद्यालयाचे नाव महाराष्ट्रभर पसरवले. सध्या या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाची धुरा प्रोफेसर डॉ. पंढरीनाथ कदम हे सांभाळत आहेत. पाच सहा वर्षांपूर्वी झालेल्या नॅक परीक्षणात महाविद्यालयास ‘बी प्लस’ हे मानांकन मिळाले. चालू शैक्षणिक वर्षात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत समितीने महाविद्यालयाची पाहणी केली. मानांकनाचे पत्र अजून आले नाही. मुधोजी महाविद्यालयाचा परिवार मानांकनाच्या पत्राची चातकाप्रमाणे वाट पहात आहे. याच महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रभाकर पवार हे खटाव तालुक्यातील असले तरी आपल्या अमोघ वाणीने त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले आहे व करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृत नागरिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या संयुक्त सहभागाने त्यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, कोल्हापुरी फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सदरचा पुरस्कार त्यांना विरोधी पक्ष गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील व शांतिदूत राज योगिनी ब्रह्मकुमारी सुनंदा दीदी यांच्या हस्ते शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला आहे.
सत्कारप्रसंगी महाविद्यालयाच्या तत्त्वज्ञान विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ. नवनाथ रासकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.पुरस्काराबद्दल प्रो. डॉ. प्रभाकर पवार यांचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.