दैनिक स्थैर्य | दि. 28 डिसेंबर 2024 | फलटण | येथील मुधोजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे ज्येष्ठ सदस्य प्रा. विक्रम आपटे यांना अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक यांच्यावतीने साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या ‘समाज गौरव पुरस्कारा’ने नाशिक येथे सन्मानित करण्यात आले.
स्व. डॉ. जगदीश कुलकर्णी (नाशिक) यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण नाशिक येथील उद्योजक देवेंद्र बापट यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकचे अध्यक्ष ऍड. अविनाश भिडे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, कार्यवाह अनिल देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“प्रा. विक्रम आपटे हे मराठी व इंग्रजी साहित्य निर्मितीत योगदान देत आहेत. कथा, लघुकथा, व्यक्तीचित्र लेखमाला, प्रवासवर्णन, मराठी, इंग्रजी भाषांतरित साहित्य निर्मिती आदीतून प्रा.आपटे यांनी आपली अष्टपैलू ओळख निर्माण केली आहे. त्याबद्दल हा समाज गौरव पुरस्कार त्यांना वितरित केला असल्याचे”, अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था, नाशिक चे अध्यक्ष ऍड.अविनाश भिडे यांनी सांगितले.