दैनिक स्थैर्य | दि. ६ जुलै २०२४ | फलटण | सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभेत संचालक मुरलीधर सावंत यांनी प्रा.रमेश आढाव यांची महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशा आशयाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास संस्था सचिव बापूसाहेब जगताप यांनी अनुमोदन दिले. प्रस्तावाचे रूपांतर ठरावात झाल्यानंतर ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
म.फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या माध्यमातून गेली ३२ वर्षांपासून निंभोरे येथे भटक्या जाती जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाच्या समाजकल्याण विभागांतर्गत अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा चालवली जात असून संस्था व्यवस्थापन व शालेय प्रशासन यांच्या योग्य समन्वयातून सामाजिक व शैक्षणिक काम केले असल्याचे सांगत संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका स्वर्गीय बेबीताई कांबळे यांचा शैक्षणिक विचार केंद्रबिंदू मानून आगामी काळात सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आपण अध्यक्षपदाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहणार असल्याचा विश्वास प्रा.आढाव यांनी यावेळी व्यक्त केला.
विशेष सर्वसाधारण सभेस संस्थेच्या संचालिका श्रीमती कांताबाई सोनवणे, जीवन जगताप, कुंदन अहिवळे, सौ.उषाताई जगताप, श्रीमती जयश्री दैठणकर, तानाजी जगताप उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष जयवंत जगताप होते.
प्रा.आढाव यांच्या निवडीबद्दल तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.