स्थैर्य, सातारा, दि. 31 : आपण आपल्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त होत आहात यानिमित्त आपणांस मनापासून शुभेच्छ व्यक्त करतो. आपण संस्थेमध्ये प्रदीर्घ काळ ज्ञाननिष्ठेने अध्यापनाचे कार्य केले आहे.
इंग्रजी विषयाचे जाणकार व अभ्यासू प्राध्यापक म्हणून आपण विद्यापीठीय कार्यक्षेत्रात नावलौकिक संपादन केलात.आपण अभ्यासक्रम मंडळ, महाराष्ट्र राज्य सेवा आयोग, अशा विविध शासकीय,सामाजिक, शैक्षणिक विभागात उल्लेखनीय कार्य केलेत. महाविद्यालयाची शैक्षणिक उपक्रमशीलता व ज्ञानात्मक गुणवत्ता जोपासण्यासाठी आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा सार्थ उपयोग केलात.
महाविद्यालयासाठी आपण दिलेले योगदान आपल्या व महाविद्यालयाच्या गौरवात भर घालणारे आहे. महाविद्यालयाचा आरसा समजल्या जाणाऱ्या ‘विद्यामृत’ वार्षिक अंकाचे आपण अनेक वर्षे सलगपणे संपादन केलेत. त्यातील अनेक लेखांना विद्यापीठाने पारितोषिक देवून गौरविले आहे.
शेवटी सेवानिवृत्ती ही अटळ बाब असते. प्रत्येकालाच त्या प्रक्रियेतून जावे लागते. सेवारंभ ते सेवानिवृत्ती या सेवाकालात आपण जपलेली मूल्ये व माणसे हीच आपली मिळकत असते. आपण ती मिळवलीत.
आपली सेवानिवृत्ती ही कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालावधीत आल्यामुळे सर्वांची इच्छा असूनही मोठ्या प्रमाणात व सभागृहात कार्यक्रम घेता येत नाही. आपल्यालाही ते अवगत आहे. पण परिस्थिती पूर्वस्थितीवर आल्यावर महाविद्यालयामध्ये सर्वांच्या वतीने आपल्या सेवा गौरवाचा कार्यक्रम घेण्यात येईल.