दैनिक स्थैर्य । दि. ०४ फेब्रुवारी २०२३ । सातारा । प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी होते असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्राध्यापक प्रबोधिनी मार्फत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर हे होते.
प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी ‘प्रा. एन. डी. पाटील यांचे कार्य आणि कर्तृत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी प्रा. एन. डी. पाटील हे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या परिसस्पर्शाने कसे घडले हे सांगताना कर्मवीरांचा एन. डी. सरांवर खूप जीव होता असे ते म्हणाले. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी सांगितले की, प्रा. एन. डी. सरांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना दररोज १६ किलोमीटर चालत जावे लागे. पुढे कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामुळे ते रयत शिक्षण संस्थेत आले. रयतमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतानाच त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य शेतकरी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी घालविले. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने केली. पुढे
एन डी सर आमदार व मंत्री झाले. एन डी सर अनिष्ट रूढी-परंपरेविरोधी होते. तसेच त्यांचा राज्यघटनेवर पूर्ण विश्वास होता. असे प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्रा. डॉ. एन. डी पाटील सरांनी सात दशके आपल्या कार्य-कर्तृत्त्वाने महाराष्ट्राच्या समाजकारणावर आपला प्रभाव पाडला होता. आयुष्यभर ते आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले. रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी खूप मोठे योगदान दिले. महर्षी विट्ठल रामजी शिंदे यांची खरी ओळख एन डी सरांनीच संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली. कोल्हापूरला खंडपीठ व्हावे म्हणून त्यांनी मोठे प्रयत्न केले. त्यांचावर महात्मा गांधीजींच्या विचारांचा मोठा प्रभाव होता त्यामुळेच ते स्वतः कम्युनिस्ट असूनही त्यांनी आपली सर्व आंदोलने महात्मा गांधीजींच्या मार्गाने म्हणजेच अहिंसेच्या मार्गाने केली. प्रा. एन. डी. सरांच्या आंदोलनाची सांगता नेहमीच यशस्वीपणे झाली असे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणाले.
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्राध्यापक प्रबोधिनी मार्फत प्रा. एन. डी. पाटील यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक प्रबोधिनीचे चेअरमन डॉ. रामचंद्र कुंभार यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. धनंजय नलवडे यांनी
केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र तांबिले यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.