स्वातंत्र्यसैनिकांचे विवेकनिष्ठ समाजनिर्मितीचे स्वप्न बाजूला फेकले गेले – प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केली खंत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत आज राहिलेला नाही. देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झालेली असताना स्वातंत्र्यसैनिकांच्या इच्छा , अपेक्षा , आकांक्षा बाजूला ठेवल्या गेल्या असल्याचे चित्र आपल्याला दिसत आहे. विवेकनिष्ठ समाजनिर्मिती व सामाजिक न्यायाचा मुद्दा पूर्णपणे बाजूला फेकल्याचे आपल्याला दिसत असल्याची खंत ज्येष्ठ राजकीय समिक्षक व शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ प्रकाश पवार यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केली.
परिवर्तनवादी संघटना समन्वय समिती , सातारा व लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारचा माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉ. शेख काका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने प्रा. डॉ. प्रकाश पवार यांचे *स्वातंत्र्य सैनिकांच्या स्वप्नातील भारत* या विषयावर लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या डॉ. बापूजी साळुंखे सभागृहात व्याख्यान आयोजित केले होते.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक तवर होते. विचार मंचावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय मांडके होते. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. पण विवेकवादालाच आपण नाकारल्याचे चित्र दिसत आहे. विवेकनिष्ठतेचा ऱ्हास होऊन हिंसा सातत्याने वाढत आहे. असे सांगून प्रा डॉ प्रकाश पवार म्हणाले की,स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील भारत पूर्णपणे बाजूला काढला गेला असून नवहिंदुत्ववाद पुढे आला आहे. त्याबद्दल गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आपल्या देशाच्या घटनेच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करता ही बाब गंभीर आहे.
राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे बाजूला सारली गेली आणि आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम राबवला. स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता होती पण त्या प्रत्येकाने त्यांचा स्वतःचा असा भारत निर्माण केला नाही तर सहमतीने निर्माण केलेल्या राज्यघटनेला अनुसरूनच भारत निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले. परंतु या स्वप्नाचा आज चुराडा होताना दिसत आहे असे स्पष्टपणे प्रा डॉ प्रकाश पवार यांनी सांगितले.
यावेळी प्रा डॉ प्रकाश पवार यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी जे विविध विचारप्रवाह या स्वातंत्र्य चळवळीत होते. त्या प्रत्येकाचा परामर्श घेऊन महात्मा फुले ,  महात्मा गांधी , डॉ बाबासाहेब आंबेडकर , पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या योगदानाचा गौरवाने उल्लेख केला.        उपप्राचार्य डॉ. अशोक तवर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कॉ शेख काका व डॉ नरेंद्र दाभोलकर तसेच स्वामी विवेकानंद , लाल बहादूर शास्त्री , श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ बापूजी साळुंखे व स्मृतीशेष सुशिलादेवी साळुंखे यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या डॉ नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  प्रास्ताविकामध्ये विजय मांडके यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉ शेख काका व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्याची महती विषद केली.आणि हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. आभार परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे मीनाज सय्यद यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा डॉ  प्रतिभा चिकमठ यांनी केले.
कार्यक्रमास प्राध्यापक , सामाजिक कार्यकर्ते , माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!