दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२१ । मुंबई । “डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाने शैक्षणिक, साहित्य, सामाजिक क्षेत्रात तळमळीनं काम करणारं ध्येयनिष्ठ, कृतीशील व्यक्तिमत्त्व हरपलं आहे. विद्यार्थी, युवक चळवळीचा मार्गदर्शक आपण गमावला आहे. साहित्य, शिक्षण, सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
डॉ. उल्हास उढाण यांना श्रध्दांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. उल्हास उढाण हे राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांचे पाईक होते. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी योगदान दिलं. युवक, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या बरोबरीनं जाणीवजागृती निर्माण करण्याचं त्यांचं ध्येय होतं. त्यांचं आकस्मिक निधन ही राज्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीची मोठी हानी आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रा. डॉ. उल्हास उढाण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.