प्रा. डॉ. अय्यर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयात इंग्रजी विषयाची नेट सेट कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०२ एप्रिल २०२२ । बारामती । विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात नामवंत प्रा. डॉ. के. एस. अय्यर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नुकतीच राज्यस्तरीय एक दिवसीय नेट सेट कार्यशाळेचे आयोजन इंग्रजी विभागामार्फत करण्यात आले होते. आपल्या हयातीत अय्यर सरांनी अशा अनेक कार्यशाळा मोफत घेतल्या होत्या. त्याचा लाभ घेऊन आतापर्यंत 300 हून अधिक विद्यार्थी या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. डॉ.अय्यर सरांनी विद्या प्रतिष्ठान मध्ये सुरू केलेली ही परंपरा तशीच अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे आणि इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय खिलारे हे कटिबद्ध असल्याचे सूतोवाच प्रा. डॉ. विलास बुवा यांनी या प्रसंगी केले.

डॉ. विलास बुवा हे या कार्यशाळेचे प्रमुख व्याख्याते आणि उद्घाटक म्हणून लाभले होते. या कार्यशाळेस ऑनलाइन आणि प्रत्यक्ष असे एकूण 171 विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

सदर कार्यशाळेत प्रा. बुवा यांच्याबरोबरच डॉ. खिलारे यांनी देखील इंग्रजी भाषेचा इतिहास या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भरत शिंदे होते. त्यांनी अय्यर सरांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे विद्यार्थ्यांप्रती असणारे प्रेम, त्याग आणि त्यांनी केलेले अतुलनीय कार्य सर्वांना प्रेरणा देत असते. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊनच महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग दरवर्षी अशी कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. राजकुमार कदम यांनी केले तर प्रमुख अतिथींचा परिचय प्रा. दादा मगर यांनी करून दिला.

या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे, डॉ. लालासाहेब काशिद व प्रा. निलिमा पेंढारकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या विद्यार्थीभिमुख कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, विश्वस्त सौ. सुनेत्रा पवार, डॉ. राजीव शहा, श्री. किरण गुजर, श्री. मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!