15 व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे

दि 2 व 3 मे रोजी सातार्‍यात होणार संमेलन


स्थैर्य, 2 फेब्रुवारी, सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रति सरकारच्या सातारच्या भूमीत शनिवार दि 2 मे व रविवार दि 3 मे 2026 रोजी होणार्‍या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत व विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे मार्गदर्शक प्रा डॉ आ.ह. साळुंखे यांची निवड एक मताने करण्यात आली आहे अशी माहिती संमेलनाच्या संयोजन समितीचे कार्याध्यक्ष विजय मांडके व सरचिटणीस एडवोकेट राजेंद्र गलांडे यांनी दिली. सह स्वागताध्यक्ष म्हणून संयोजन समितीचे अध्यक्ष असलेले ह. भ. प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांची निवड करण्यात आलेली आहे.

ज्येष्ठ विचारवंत , मराठीतील ख्यातनाम व्याख्याते व संस्कृतचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ आ.ह. साळुंखे हे मुंबईच्या धारावी येथे 1999 साली झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटक होते. सोलापूर येथे झालेल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तेव्हापासूनच ते विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी संबंधित आहेत व मार्गदर्शकही आहेत. कोणत्याही प्रकारे अखिल भारतीय म्हणवणार्‍या साहित्य संमेलनाशी त्यांचा संबंध आलेला नाही.

स्वागताध्यक्ष व सहस्वागताध्यक्ष यांच्या निवडी बरोबरच संमेलनाच्या तारखा ही निश्चित करण्यात आलेल्या आहेत. शनिवार दि 2 मे व रविवार दि 3 मे 2026 रोजी हे संमेलन सातारा येथे होणार आहे, असेही विजय मांडके व अ‍ॅड. राजेंद्र गलांडे यांनी सांगितले.

प्रा. डा. आ.ह. साळुंखे व ह भ प डॉ सुहास महाराज फडतरे यांच्या निवडीबद्दल त्यांचे डॉ भारत पाटणकर , विद्रोही सांस्कृतीक चळवळीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव व सरचिटणीस डॉ जालिंदर घिगे , डॉ बाबुराव गुरव , अ‍ॅड. सुभाष पाटील , कॉ अविनाश कदम मुंबई, प्रा गौतम काटकर यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!