
दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । सातारा । ‘’रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कळवळा, जाणीव व संस्कारातून तसेच रयतेच्या भरीव योगदानातून उभी राहिलेली संस्था असून ती समाजातील तळागाळातील लोकांच्या शिक्षणासाठी तसेच कल्याणासाठी बांधिलकीने विविध उपक्रम राबवीत असते. रयत शिक्षण संस्थेची सामाजिक बांधिलकीची प्रेरणा सर्वाना मार्गदर्शक आहे. याच जाणीवेतून दातृत्व भावना जन्म घेते असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य,व कर्मवीर विद्याप्रबोधिनीचे आर.टी.एस प्रकल्प प्रमुख प्रा.चंद्रकांत जडगे यांनी व्यक्त केले. ते वर्ये येथील रयत जयसिंगराव मल्हारी करपे हायस्कूल वर्ये येथे गरजू
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रमात बोलत होते. प्रा.चंद्रकांत जडगे व सौ.शोभा जडगे यांनी ७ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना स्व खर्चाने गणवेश घेऊन त्याचे वाटप केले.तसेच शालेय शैक्षणिक साहित्यासाठी विद्यालयास दहा हजार रुपयांची देणगी दिली.विद्यालयाच्या
मुख्याध्यापिका सुनिता सुभाष वाघमारे यांनी याचा स्वीकार केला व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करताना प्रा.चंद्रकांत जडगे म्हणाले की ‘’ आपण कोणत्याही परिस्थितीतून आलो असलो तरी विद्यार्थ्यांनी ध्येय उच्च ठेवावे. विद्यार्थ्यांजवळ निरीक्षण क्षमता, समयसूचकता, आत्मविश्वास या गोष्टी असतील तर
आपल्याला अपेक्षित ध्येय पूर्ण करता येते. यश हमखास मिळते रयत शिक्षण संस्थेचा विचार हा समतेचा विचार आहे ती रयत शिक्षण संस्थेची संस्कृती आहे. यासाठी कर्मवीर अण्णांचे चरित्र प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचले पाहिजे.समाजसुधारकांचे आधुनिक विचार घेतले
पाहिजेत.आणि रयत शिक्षण संस्थेच्या व भारतीय घटनेच्या मूल्यांचेही आचरण करावे’’ असे ते म्हणाले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध प्रकल्पाची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच विविध प्रकारच्या शारीरिक,मानसिक ,भाषिक क्षमता संपादन करण्यासाठी कौशल्याची माहिती त्यांनी दिली. रयत शिक्षण संस्थेतील सेवक वेळेचे बंधन न पाळता अधिक वेळ देऊन काम करीत असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली. या कार्यक्रमात प्रारंभी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व रयतमाऊली सौ.लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री.सुधाकर शिंदे यांनी स्वागत केले. सौ.जाधव व्ही.एस. यांनी सूत्रसंचालन केले. श्री.भोसले आर.डी.यांनी आभार मानले.