
स्थैर्य, जावली, दि. ११ सप्टेंबर : जाई एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव प्रा. अमोल चवरे यांना, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे एक्सिड विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बारामती आणि लातूर सायन्स अकॅडमी, बारामती यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. संतोष गोरे, प्रा. अंकुश पवार आणि प्रा. अक्षय गुळवे यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा संपन्न झाला. फलटण तालुक्यातील जावलीसारख्या ग्रामीण आणि दुर्गम भागात इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करून शैक्षणिक क्रांती घडवल्याबद्दल प्रा. चवरे यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. त्यांनी २०१६ साली स्थापन केलेल्या राॅयल इंग्लिश स्कूलमुळे जावली, मिरढे, बरड, राजुरी, कुरवली या परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे.
शेतकरी कुटुंबातून येऊन, अत्यंत खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत प्रा. अमोल चवरे यांनी ही संस्था उभी केली आहे. आज या संस्थेचे ज्युनिअर कॉलेजपर्यंत विस्तार झाला असून, शाळेला ‘आयएसओ’ मानांकनही प्राप्त आहे. त्यांच्या या कार्यामुळे इंग्रजी शिक्षणासाठी शहराकडे जाणारा विद्यार्थ्यांचा ओघ कमी झाला आहे.
या पुरस्काराबद्दल राॅयल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, शिक्षक, पालक आणि जावली ग्रामस्थांच्या वतीने प्रा. अमोल चवरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.