मुधोजी महाविद्यालयात ‘ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर ‘ हे स्वयंचलित उपकरणाची निर्मिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. संपूर्ण जगाला हादरून टाकणा-या या विषाणूला रोखण्यासाठी अनेक स्तरावर वेगवेगळी संशोधने सुरू आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ठराविक कालावधीत हात निर्जंतूक करणे अत्यंत आवश्यक असते. याकरिता बाजारात आज अनेक प्रकारचे सॅनिटाईजर्स उपलब्ध आहेत. मात्र सॅनिटाईजर्स वापरताना देखील खूप काळजी घेणे गरजेचे असते. नाहीतर ते  वापरतानाच धोका होण्याचा संभव अधिक असतो. यावर अत्यंत सुरक्षित उपाय म्हणून मुधोजी महाविद्यालयातील संगणक विभागातील प्रा. रूपेश रमाकांत कुलकर्णी व प्रा. राकेश रमाकांत कुलकर्णी या बंधूंनी अत्यंत कमी खर्चात ‘ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर ‘ हे स्वयंचलित उपकरणाची निर्मिती केलेली आहे.

ऑटोमॅटिक हॅन्ड सॅनिटाईजर डिस्पेंसर आता काळाची गरज बनली आहे. या प्रकारचे किटस् बाजारामध्ये दोन हजार रुपयांपासून ते १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. मात्र अत्यंत कमी प्रोडक्शन कॉस्ट मध्ये सदरचे ‘ऑटोमॅटिक हॅण्ड सॅनिटाईजर डिस्पेन्सर किट’ प्रा. कुलकर्णी बंधूंनी बनवले आहे. या किटचा वापर विविध सामाजिक संस्था, दुकाने, शाळा, महाविद्यालये या ठिकाणी होऊ शकतो. तसेच हे किट कारमध्ये देखील वापरता येऊ शकते. या किटला USB चार्जर जोडल्याने अत्यंत कमी विजेवर हे किट चालते. त्यामुळे विजेची देखील बचत होते. या किटचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या किटमध्ये ‘सेन्सर’ चा वापर केला असून किट समोर हात येताच हातावर सॅनिटाईजर आपोआप फवारले जाते.  या प्रक्रियेत हाताचा कोणत्याही प्रकारचा स्पर्श होत नसल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खूप मदत होऊ शकते. या किटमध्ये अजून सुधारणा करून १ लिटर ते ५ लिटर सॅनिटाईजर क्षमता असलेल्या कंटेनरच्या स्वरूपात व माफक दरात सदरचे किट लोकांपर्यंत पोहचवण्याचा कुलकर्णी बंधूंचा मानस आहे.

नुकतेच या उपकरणाचे प्रात्यक्षिक महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रसंगी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रा. कुलकर्णी बंधुंचे अभिनंदन करून या उपकरणाच्या निर्मिती व वापरास शुभेच्छा दिल्या.

या उपकरणाच्या संशोधन व निर्मितीस मुधोजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.ए.आर.गायकवाड, संगणक विभाग प्रमुख प्रा.एस्.एस्.लामकाने आणि इलेक्ट्रॉनिक विषयाच्या प्रा. सौ.ए.एस्.कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या उपकरणाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. कुलकर्णी बंधुंनी केले आहे. सदर उपकरणासाठी ९९७०५२८२४८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!