
सातारा – शोभा यात्रेत विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी लोककलेचे सादरीकरण केले. (छायाचित्र – अतुल देशपांडे)
स्थैर्य सातारा, 1 जानेवारी : या ऐतिहासिक नगरीत होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडी व शोभायात्रेत भारतीय संत परंपरेपासून समाजसुधारकांचे कार्य, भारतीय संस्कृती, लोकसाहित्य तसेच सातार्यातील शिक्षण, पर्यटन आणि साहित्य परंपरांचे चित्रण दिसून आले. यात सातारा जिल्ह्यातील एकूण 55 शाळा व महाविद्यालयांचे चित्ररथ समाविष्ट होते . तसेच शिक्षण विभागातून प्रत्येक तालुक्याचा एका या प्रमाणे 11 व जिल्हा परिषदेचा एक चित्ररथ समाविष्ट होते .
या चित्ररथांच्या माध्यमातून मराठी संत साहित्यातील सुविचार तसेच मराठी सारस्वतांनी मराठी भाषेच्या योगदानासाठी केलेल्या साहित्य निर्मितीचे दर्शन सातारकरांसह संमेलनासाठी येणार्या जगभरातील साहित्यप्रेमींना घडले.या भव्य दिव्य ग्रंथदिंडी व चित्ररथ सोहळ्याचा शुभारंभ राजवाडा परिसरातील गांधी मैदान येथून मान्यवरांचे उपस्थितीत करण्यात आला .यावेळी मैदान परिसरात काढलेल्या भव्य आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधून घेणार्या होत्या. छत्र्या. पालखी तसेच अश्वावर बसलेले पारंपरिक विषयातील फेटेदारी युवक आणि नऊवारी साडी दिली होती लक्ष वेधून घेणार्या होत्या
फुलांनी सजवलेल्या या पालखीमध्ये विविध नामवंत लेखकांचे ग्रंथ तसेच पुस्तकांचे पूजन या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील , संमेलनाचे स्वागताध्यक्ष नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी,कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत,महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्यावर हा ग्रंथ दिंडी व चित्ररथ सोहळा राजवाडा येथून मोती चौक मार्गे देवी चौकातून शेटे चौक , नाका मार्गे संमेलनस्थळी सायंकाळी उशिरा आला.
यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सातारा शहर परिसरातील तीर्थक्षेत्रे पर्यटन स्थळे यांचे दर्शन घडवले. ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वारसा ,शिक्षण आणि पुस्तक वाचा ही संकल्पना सादर केली.यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने शिवाजी महाराज व त्यांना प्रेरणा देणारे जिजाबाई सादर केल्या .सावकार इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विद्यार्थ्यांनी लोककलेचे सादरीकरण केले ही चित्ररथ दिंडी सातारा शहरातील प्रमुख राजपथावरून जात असताना सातारकरांनी या सर्व कलाकारांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले .तसेच चौका चौकात विविध आकर्षक पद्धतीने केलेली विद्युत रोषणही तितकीच लक्ष वेधून घेणारी होती .या ग्रंथदिंडीच्या अग्रभागी अश्वशवार तसेच छत्र हातात धरून पारंपारिक वेशभूषेत मावळे साकारले गेले होते. गुरुकुल स्कूलने साकारलेले एनसीसी पथक लक्ष वेधून घेणारे होते.

