स्थैर्य, फलटण, दि. ४ : क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि बालिकादिन अशा संयुक्त कार्यक्रमाचे निमित्ताने नायगाव, ता. खंडाळा येथे आलेल्या राज्याच्या शिक्षण मंत्री ना. प्रा. वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन एकल प्रा. शिक्षक सेवा मंचचे राज्य उपाध्यक्ष नंदकुमार दंडीले, जिल्हाध्यक्ष विकास खांडेकर, जिल्हा संपर्क प्रमुख राजेश पाटोळे, फलटण तालुका सरचिटणीस राहुल नेवसे यांनी प्रा. शिक्षकांच्या मागण्यांचे निवेदन देऊन त्याची सोडवणूक करण्याची विनंती केली.
निवेदनामध्ये प्रा. शिक्षक सेवकांना दिले जात असलेले दरमहा ६ हजार रुपये मानधन अत्यल्प असून वाढत्या महागाईच्या काळात कुटुंबाच्या खर्चाचा मेळ घालताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे निदर्शनास आणून देत ते किमान १५ हजार रुपये करावे, इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी च्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना ११ ते २ यावेळेत नियमीत उपस्थित राहणे बाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश मिळावेत अशी दुसरी मागणी करताना ५० % उपस्थितीचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत मात्र ते संदीग्ध असल्याचे सांगत दि. २९ ऑक्टोबरच्या शासन निर्णया नुसार शिक्षक, कर्मचारी यांनी ऑनलाइन/ऑफलाइन/दूरस्थ शिक्षणाशी संबंधीत कामासाठी ५० % उपस्थितीबाबत सूचीत करण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले, मंत्री महोदयांनी निवेदन स्वीकारुन त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन या प्रा. शिक्षक प्रतिनिधींना दिले आहे.
दरम्यान या शिक्षक प्रतिनिधींनी क्रांतीसूर्य म. फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक स्थळी जाऊन अभिवादन केले.