स्थैर्य, सातारा, दि. 3 : मराठा समाजाच्या उन्नतीकरणासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेबाबत तातडीने योग्य तो निर्णय घेवून कार्यवाही करावी तसेच कोयना धरण व अभयारण्यग्रस्त लोकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी खा. श्री. छ. उदयनराजे भेासले यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे शुक्रवारी केली.
खा. उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर येथील निवासस्थानी ना. वडेट्टीवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ना. वडेट्टीवार आणि खा. उदयनराजे यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. सुमारे पाऊण तास चाललेल्या सदिच्छा भेटी दरम्यान, खा. उदयनराजे यांनी कौटुंबिक विषयाशिवाय लोककल्याणाच्या विषयावर जास्त प्रकर्षाने चर्चा केली.
छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण व संशोधन व मानव विकास संस्था, सारथी या संस्थेची स्वायत्तता खंडित होता कामा नये. यासाठी प्रयत्न करावेत. छत्रपती शाहू महाराज यांचे जीवंत स्मृती स्मारक सारथीच्या रूपाने उभे असल्याने त्याचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू रहावे, सारथीला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी नोकर भरती झाली पाहिजे. सारथी संस्थेचा निधी परत गेला. तो कसा गेला याची चौकशी व्हावी व संस्थेची व सर्व संचालकांच्या चौकशीचे काम लवकर पूर्ण व्हावे, सारथीसाठी आवश्यक तरतूद आणि संशोधन शिष्यवृत्तीचा प्रश्न निकाली काढावा, असेही याप्रसंगी नमूद केले. कोयना धरणग्रस्तांच्या बाबतीत बरीच हेंडसाळ झाली आहे. धरण होवून सुमारे 60 वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. अद्याप पुनर्वसनाचा प्रश्न सुटलेला नाही. पुनर्वसनपात्र धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्तांची यादी तयार करावी. बोगस लाभधारक शोधून काढावेत. कोयनेचे पाणी ज्या ठिकाणपर्यंत पोहोचत नाही त्या ठिकाणी पुनर्वसन करावे. पुनर्वसनातील जमिनींची सिंचनसोय करण्यात यावी. पुनर्वसन होईपर्यंत निर्वाहभत्ता मिळावा इत्यादी समस्या खा. उदयनराजे यांनी मांडल्या.
या सर्व प्रश्नांची तातडीने दखल घेतली जाईलच आणि त्याबद्दल केलेली कार्यवाही शक्य तितक्या लवकर आपणास मंत्रालयीन स्तरावरून आणि व्यक्तिगत स्तरावरून कळविली जाईल, असे आश्वासन या प्रसंगी ना. विजय वडेट्टीवार यांनी दिले.
यावेळी जावलीचे माजी आ. सदाशिव सपकाळ, सुनील काटकर, अॅड. भरत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.