फलटणमध्ये स्वच्छतागृहाविना महिलांची अडचण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 3 मार्च 2025 । फलटण ।
फलटण शहरात सध्या अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय झाली असून, ती वापरायोग्य नसल्याने शहरात येणार्‍या तरुणी व महिलांची मोठी अडचण होत आहे. विशेष म्हणजे महिलांसाठी फलटण शहरात अस्तित्वात असलेली स्वच्छतागृहे शहरात स्वच्छ व सुरक्षित असे एकही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे महिला व युवतींची ससेहोलपट होण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याअगोदर फलटण शहरात पूर्वी 14 स्वच्छतागृहे होती यापैकी 6 स्वच्छतागृहे पाडण्यात आली. त्याचबरोबर शंकर मार्केटमध्ये स्वच्छतागृह होते; परंतु ते प्रशासनाने काढून टाकण्यात आले. त्यानंतर या ठिकाणी अतिक्रमण होऊन दुकान गाळा बांधला गेला, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळी या ठिकाणी मंडई भरते. मंडईसाठी ग्रामीण भागातून येणारे शेतकरी, महिला व ग्राहकांचे स्वच्छतागृहाअभावी हाल होतात. काही शेतकरी जवळच आडोशा बघून त्याठिकाणी लघुशंका करत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

दरम्यान, पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील बैठकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी तात्पुरते स्वच्छतागृह बसवण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी एका आठवड्यात अशी स्वच्छतागृहे बसवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही अशी स्वच्छतागृह बसविली गेलेली नाहीत.

शहरातील शंकरमार्केट, रामराजे शॉपिंग सेंटर, राजमाता अहिल्यादेवी चौक, भूमी अभिलेख कार्यालय परिसर, गिरवी नाका, पाचबत्ती चौक, गजानन चौक, नाना पाटील चौक या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह असावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.


Back to top button
Don`t copy text!