दैनिक स्थैर्य । दि. २४ जून २०२२ । मुंबई । भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित कर्मयोगी नमो लघुपट स्पर्धेचा रविवार दिनांक २६ जून २०२२ रोजी कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होणार असून, स्पर्धेतील विजेत्यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, प्रशांत दामले, मृणाल कुलकर्णी या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठचे ॲड. शैलेश गोजमगुंडे यांनी दिली.
भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक ॲड. शैलेश गोजममुंडे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीवर ‘कर्मयोगी नमो’ लघुपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राज्य व देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशभरातून एकूण १३५ स्पर्धेकांनी या स्पर्धेतून सहभाग घेत, एक ते बारा मिनिटाचे लघुपट सादर केले होते. यापैकी, काही निवडक लघुपट मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: पाहून विशेष पसंती दर्शवली होती. त्यापैकी, उत्कृष्ट लघुपटांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
येत्या रविवारी (दिनांक २६ जून २०२२) रोजी सकाळी ९ वाजता कोथरुडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मानसी मागीकर, युवा नाट्य सिनेअभिनेता आरोह वेलणकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. या समारंभास पुणेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आले आहे.