दैनिक स्थैर्य । दि. २५ जुन २०२१ । सातारा । सातारा जिल्ह्यात शासकीय व खाजगी कोविड रॅपीड अँटीजन टेस्ट तपासणी केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. या तपासणी केंद्रामध्ये तपासणीसाठी आलेल्या संशयित रुग्णांचे नमुने घेतले जातात. या सर्व रुग्णांची शासकीय पोर्टलवर दैनंदिन ऑनलाईन नोंद करणे बंधनकारक असताना बऱ्याच ठिकाणी संशयित रुग्णांना तोंडी किंवा त्यांच्या लेटरहेडवर लेखी स्वरुपात रॅपीड अँटीजन टेस्ट रिपोर्ट दिले जात असल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांची ऑनलाईन पोर्टलवर विहित मुदतीत नोंद केली जात नसल्यामुळे जिल्हास्तरावर जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषद येथे रिपोर्टिंग करताना अनेक अडचणी निर्माण होत आहे. या बाबी प्रशासकीय दृष्ट्या गंभीर स्वरुपाच्या असल्याने सर्व खाजगी लॅब संस्थांनी त्यांचेकडे होणाऱ्या रॅपीड टेस्टचे रिपोर्ट देताना रुग्णांची ऑनलाईन पोर्टलवर नोंद करुन आयसीएमआर आयडी तयार केल्याशिवाय संबंधितांना रिपोर्ट देण्यात येऊ नयेत. जे खाजगी लॅबधारक रॅपीड टेस्टचे रिपोर्ट आयसीएमआरच्या पोर्टलवरुन डाऊनलोड करुन न देता त्यांचे स्वत:च्या लॅबच्या लेटरपॅडवर अथवा अन्य मार्गाने रिपोर्ट संबंधितांना दिल्याचे आढळल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग कायदा 1897 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येऊन संबंधित लॅब सिल करुन परवाना रद्द करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.