
स्थैर्य, फलटण, दि.०२: कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या उपचाराचे दर निश्चित करण्यात आले आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतच्या अधिसूचनेला मंजूरी दिली आहे. यानुसार आता शहरांचे वर्गीकरण करून दर निश्चित केलेले आहेत, यात निश्चित दरांशिवाय अधिक दर कोणत्याही रूग्णालयाला आकारता येणार नाहीत, अशी माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
यापुर्वीच्या अधिसुचनेत उपचारांचे दर हे मोठ्या शहरातील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारच्या भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहेच. दरांसाठी शहरांच्या दर्जानुसार वर्गीकरण करण्यात आले आहे. अ, ब, क अशा गटात शहरे व भागांची विभागणी केली आहे त्यामुळे आता शहरी व ग्रामीण भाग यामध्ये उपचारांचा दर वेगवेगळा असेल व पर्यायाने ग्रामीण भागात तुलनेने कमी खर्चात उपचार शक्य होतील, असेही प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी स्पष्ट केले.
रुग्णाला संबंधित रुग्णालयाने पुर्वलेखापरिक्षीत देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय जास्त दर आकारणाऱ्या रुग्णालयांवर भरारी पथकांमार्फत पुन्हा तपासणी करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची तरतूदही या अधिसूचनेत कायम ठेवण्यात आली आहे अशी माहिती सुध्दा प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.