स्थैर्य, नाशिक, दि.०३: कोरोनाच्या या लढाईत खाजगी डॉक्टर्स, नर्स व स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून दररोज जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. आज त्यांनी येवला दौऱ्यावर असतांना विंचूर व लासलगाव येथील डेडिकेटेड कोविड सेंटरची पाहणी केली. यावेळी रुग्णांना योग्य प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात की नाही याची खातरजमा करत रुग्णांची चौकशी केली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी तहसिलदार शरद घोरपडे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, सरपंच सचिन दरेकर, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर प्रथमतः विंचूर येथे उभारण्यात आलेल्या खाजगी कोविड केअर सेंटरची पाहणी करत डॉक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी लासलगाव ग्रामीण रुग्णालयात भेट दिली. लासलगाव ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० बेडस कार्यान्वित असून अधिक १० ऑक्सिजन बेड्स वाढविण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ते म्हणाले की, मनुष्य वाचविण्याची ही संकटाची लढाई प्रत्येकाने जबाबदारी ओळखून या लढ्यात उतरावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून लासलगाव उड्डाणपूल व बायपास रस्त्याच्या कामाची पाहणी
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज लासलगाव रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपूल व बायपास रस्त्याची पाहणी केली. सदर रस्त्याचे व उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भूसंपदानाबाबत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून घ्याव्यात असे आदेश त्यांनी यावेळी दिले.