दैनिक स्थैर्य । दि.१० एप्रिल २०२२ । सातारा । ४५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने अत्यंत दिमाखात शनिवारी रात्री झालेल्या अंतिम फेरीमध्ये पटकावली. त्याने लढतीमध्ये पाच विरुद्ध चार गुणांनी मुंबईच्या विशाल बनकर यांचा शेवटच्या दीड मिनिटांमध्ये दुहेरी पट काढून पराभव केला. यानंतर पृथ्वीराज समर्थकांनी त्याला उचलून घेत आखाड्यामध्ये एकच जल्लोष केला. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी विजेते पृथ्वीराज पाटील याला चांदीची मानाची गदा देण्यात आली.
साताऱ्यातील क्रीडासंकुलात जमलेल्या 25000 कुस्ती शौकिनांनी या थरारक गोष्टीची मजा लुटली. शनिवारी शेवटच्या दिवशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा कोण पटकावणार याची महाराष्ट्राच्या कुस्ती वर्तुळामध्ये प्रचंड उत्सुकता ताणली गेली होती. अंतिम फेरीमध्ये कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील तर मुंबईच्या विशाल बनकर यांनी मुसंडी मारत भल्याभल्या महाराष्ट्र केसरी ना उपांत्यपूर्व फेरीमध्ये गारद केले होते. सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पद्मश्री महाबली सतपाल सिंग आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कुस्तीगीर परिषदेचे बाळासाहेब लांडगे संयोजक दीपक पवार साहेबराव पवार सुधीर पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही महिलांनी हस्तांदोलन केले. पंच रवी बोत्रे यांनी सात वाजून दहा मिनिटांनी सुट्टीचा पुकारा केला आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या थरारक लढतीला प्रत्यक्ष सुरुवात झाली. पहिला एक मिनिटातच दोन्ही मल्लांनी चपळाईने एकमेकांचा पट काढण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्लॉकिंग हात पकडून ठेवण्याच्या विशाल बनकर यांच्या पद्धतीला पंचांनी आक्षेप घेऊन त्याला वॉर्निंग दिली. त्यानंतर काही सेकंद दोन्ही मल्ल एकमेकांची कोणत्याही चढाई शिवाय झुंजत राहिले. विशाल काही जोरदार चाली रचत पृथ्वीराज ला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला. विशालने त्याच्या नैसर्गिक उंचीचा उपयोग करून त्याला आपल्या कह्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र पाटील यांनी प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवत 4-1 अशी आघाडी घेतली. या पहिल्या फेरीमध्ये जोरदार डाव-प्रतिडाव पाहायला मिळाले एकेरी पटाचा सुद्धा दोन्ही मल्लांनी प्रयत्न करत एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न केला विशाल आपले आक्रमण सुरूच ठेवले आणि या माध्यमातून कोणतीही संधी दिली नाही. शेवटच्या दीड मिनिटांमध्ये पुन्हा जोरदार हालचाल करत पाटीलने विशाल बनकर यांचा दुहेरी पट काढत जोरदार टक्कर दिली शेवटच्या मिनिटांमध्ये पुन्हा विशाल वर जोरदार चढाई करत पाच विरुद्ध चार अशा गुणांच्या फरकाने ही ही लढत जिंकली. त्यामुळे पंच रवी बोत्रे यांनी पृथ्वीराज ला विजयी घोषित करताच त्यांच्या समर्थकांनी जोरदार जल्लोष केला त्याला उचलून घेत संपूर्ण आखाड्याची समर्थकांनी फेरी मारली.
कुस्ती शौकिनांनी सुद्धा पृथ्वीराज या खेळीला जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. व्यासपीठावर जमलेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी या थरारक कुस्ती चा आनंद लुटला. पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूरचा पन्हाळा तालुक्यातील मोतीबाग तालमीचा पैलवान आहे. संग्राम पाटील यांच्याकडून त्याने कुस्तीचे धडे गिरवले होते. यंदाचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने प्रतिनिधित्व करत प्राथमिक फेरी पासून अंतिम फेरीत धडक मारत नामवंत मल्लांना चितपट केले व पदकाची कमाई केली होती. गादी कुस्ती वरील अनेक बारकाव्यांचा त्याला उपयोग झाल्याचे त्याने कुस्ती स्पर्धे नंतर सांगितले आणि सातत्याचा सराव त्याचबरोबर आपल्या आक्रमक खेळाला तंत्र कौशल्याची जोड यामुळे आपल्याला यश मिळाल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.