
दैनिक स्थैर्य । 19 जुलै 2025 । सातारा ।राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातीलफुटीनंतर कार्यकर्त्यांत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. आता पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपविल्यानंतर कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात पक्ष बांधणीला प्राधान्य दिले जाणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी स्थानिक जिल्हाध्यक्ष व नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जातील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली.
हिंदी भाषा सक्तीचा मुख्यमंत्र्यांचा अट्टहास असून, त्यांनी जबरदस्ती केल्यास महाराष्ट्रातील जनता गप्प बसणार नाही, असे सांगून आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, हिंदी भाषेची सरकारने सक्ती करू नये. मातृभाषेला व्यापकता आहे. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काही निर्णय सध्याचे सरकार घेत आहे. यातून काही कार्यकर्त्यांना बोलायला लावून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राविषयी परराज्यातील खासदार काही अक्षेपार्ह बोलत असतील, तर ते महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शशिकांत शिंदेयांचे जिल्ह्यात प्रथमच आगमन झाल्यामुळे त्यांचे शिरवळपासून कर्हाडपर्यंत विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. सातार्यात राष्ट्रवादी भवनात त्यांचे महिला आघाडीने स्वागत केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
आमदार शिंदे म्हणाले, पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी खासदार शरद पवार यांनी दिल्यानंतर कर्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन करण्यासाठी जाताना जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. पक्षात पडलेल्या फुटीनंतर कार्यकर्त्यांत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते; पण आता पक्षाला ऊर्जितावस्था देण्याचे काम केले जाणार आहे. आता राज्यभर पक्ष बांधणीला प्रधान्य दिले जाईल. आमदार रोहित पवारांसोबत आम्ही 23, 24, 25 जुलैला फ्रंटल सेलच्या बैठका मुंबईत होतील. त्यानंतर जिल्हानिहाय दौरा करून लोकांचे प्रश्न व समस्या जाणून घेणार आहोत. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासोबत त्यांना ताकद देण्याचे काम होईल, तसेच कार्यकर्ता ते थेट नेता असा संपर्क वाढविला जाणार आहे. आगामी 2029 च्या निवडणुकीत पुन्हा पक्ष सत्तेवर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत निर्णय घेण्याचे अधिकार त्या- त्या जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांना दिले जातील, तसेच महाविकास आघाडीबाबत मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.