सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ जानेवारी २०२३ । मुंबई ।पायाभूत सुविधा आणि आवश्यक मनुष्यबळ देऊन राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, सचिव नवीन सोना, आरोग्य आयुक्त धीरज कुमार, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. स्वप्नील लाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आजच्या दिनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवा करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी यांचा सत्कार करताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या राज्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले की, आरोग्य क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारातून काम केले जात आहे. रुग्णवाहिका सुरू करण्याची संकल्पना बाळासाहेब ठाकरे यांची आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेला रुग्णवाहिका, पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री, मनुष्यबळ देऊन बळकटीकरण केले जाणार आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर मदत देण्यात येत आहे. मुंबईत २५० ठिकाणी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे. घराशेजारी आरोग्य व्यवस्था पुरविण्यासाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. मातामृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभाग कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचार कोटी महिलांची तपासणी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात शस्त्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर बाल सुरक्षा अभियानात १८ वर्षांखालील मुलामुलींची तपासणी केली जाणार आहे.

प्रास्ताविक आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी, तर आभार उपसंचालक कैलास बाविस्कर यांनी मानले.

कार्यक्रमात स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार हॅलो मेडिकल फाऊंडेशन, अणदूर, उस्मानाबाद.

उत्कृष्ट डॉक्टर डॉ. प्रमोद पोतदार, शरीर विकृती शास्त्र, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमरावती.

डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कोल्हापूर, डॉ. सदानंद राऊत, पुणे

पत्रकाराचा – संदीप आचार्य, सहयोगी संपादक, दैनिक लोकसत्ता, ठाणे

उत्कृष्ठ कर्मचारी पुरस्कार – धर्मा विश्वासराव वानखेडे, आरोग्य सहाय्यक, अमरावती. मिलिंद मनोहर लोणारी, स्वच्छता निरीक्षक, जळगाव. प्रशांत संभाप्पा तुपकरी, आरोग्य कर्मचारी, हिंगोली. किशोर वैद्य, आरोग्य कर्मचारी, नागपूर. दिलीप बाबूराव कचेरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, पुणे यांना प्रदान करण्यात आले.

प्रत्येकी एक लाख रुपये रोख, सन्मान चिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.


Back to top button
Don`t copy text!