गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य – पालकमंत्री बच्चू कडू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । मुंबई । शहरातील क्रीडा संकूलांमध्ये तसेच तालुकास्तरावर  तयार होत असलेल्या क्रीडा संकुलांमध्ये गुणवत्तापूर्ण व आधुनिक क्रीडा सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी सोमवारी (दि.4) येथे दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकूल समितीची बैठक पार पडली. याबैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव,गणेश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य विभागप्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील तालुका क्रीडा संकूलांबाबत आढावा यावेळी घेण्यात आला. सांस्कृतिक भवन बांधकामात दुसऱ्या टप्प्यातील कामे करण्याबाबत नगरविकास विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून  त्यात आंतरीक कामे, विद्युतीकरण, पिण्याच्या पाण्याची सुविधा,  सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा, अग्निशमन सेवा तसेच स्टेज, आसन व्यवस्था, प्रसाधन गृहे, ग्रीन रुम,  भांडारगृहे इ. कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी पाच कोटी 48 लक्ष 67 हजार रुपयांचे अंदाजपत्रक व आराखडे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग व सार्वजनिक बांधकाम मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा संकुलास 7 कोटी रुपये व तालुका क्रीडा संकुलासाठी 2 कोटी रुपये निधी  उपलब्ध होणार असून  त्याअंतर्गत सिंथेटीक रनिंग ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, हॉकीचे एस्टोटर्फ मैदान, फुटबॉल मैदान व अन्य सुविधांचे नुतनीकरण तसेच तालुका क्रीडा संकुलात कुस्ती हॉल, कबड्डी, खो खो साठी इनडोअर हॉल इ. बाबींचा समावेश आहे. क्रीडा संकुलांमध्ये येणाऱ्या खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, त्या सुविधांची उत्तम देखभाल राखणे याबाबतही पालकमंत्री कडू यांनी उपस्थितांना निर्देशित केले.


Back to top button
Don`t copy text!