जल जीवन मिशन आराखड्यातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि. ५:  जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाच्या घरात वैयक्तिक नळ जोडणीच्या कामांचे उद्दीष्ट पूर्ण करावे या योजनेच्या कामास अधिकाऱ्यांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना राज्याचे सहकार व पणन मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी ‍आज दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गृह(ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार जयकुमार, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा नियोजन अधिकारी भगवान जगदाळे यांच्यासह बांधकाम विभाग, महिला बाल विकास, लघूपाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा विभागाचे संबंधित प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पेय जल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करुन या मिशन अंतर्गत सन 2024 अखेर ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नवीन वैयक्तिक नळजोडणी व पूर्नजोडणीद्वारे प्रतीदिन दरडोई किमान 55 लिटर पाणी पुरवठा करण्यास शासन कटीबध्द आहे. ही योजना येत्या चार वर्षात पूर्ण करावयाची आहे. यासाठी संबंधित अधिका-यांनी या योजनांची चालू वर्षातील कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. सातारा जिल्ह्यासाठी सन 2020-21 आराखड्यात सद्यस्थितीत प्रगतीपथावर असलेल्या व नवीन प्रस्तावित तसेच जुन्या पूर्ण योजनांच्या नळ पूर्नजोडणीच्या 1963 योजनांसाठी 147.68 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जल जीवन मिशन योजना राबवितांना संबधित तालुक्यातील आमदारांच्या सूचना विचारात घ्याव्यात, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जल जीवन मिशन ही योजना राबवितांना अडचणी आल्यास त्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक घेऊन त्या सोडवण्यास प्राधान्य देऊ, असे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले. यावेळी कार्यकारी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांनी जल जीवन मिशन योजनेचे सादरीकरण सादर केले.


Back to top button
Don`t copy text!