
दैनिक स्थैर्य । 8 मार्च 2025। मुंबई। पायाभूत सुविधा चांगल्या होतील. तेवढी आपल्या आपल्या राज्याची प्रगती चांगली होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, धार्मिक स्थळे, विमानतळे, बंदरे यांची कनेक्टिव्ही वाढेल, यासाठी प्राधान्याने काम केले जाणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
शिवेंद्रराजे म्हणाले, कामाच्या दर्जाबाबत कोठेही तडजोड करायची नाही, याबाबत अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. चुकीचे कामे होत असतील, वेळीच ते काम थांबवण्याबाबतही सूचना दिल्या आहेत. खड्डे भरण्याचे काम शास्त्रोक्त पध्दतीने केले पाहिजे, याबाबत सूचनाही यंत्रणेला दिल्या आहेत. राज्यातील सर्व मतदारसंघांना स्पर्श करणारा हा विभाग आहे. रस्ते, पूल, मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल, शाळा खोल्या, पोलीस स्टेशन, मुख्यालय इमारती अशी सर्व कामे शहरी, ग्रामीण, आदिवासी, डोंगरी आदी सर्वच मतदारसंघात हा विभाग काम करत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त निधी आमच्या मतदारसंघात येवून जास्त कामे झाली पाहिजेत, अशा सर्वांच्या अपेक्षा असतात. गतीने, दर्जेदार पध्दतीने पूर्ण झाली पाहिजेत, अशी इच्छा अपेक्षा मतदासंघातील लोकप्रतिनिधी, जनतेची असते. त्याच पध्दतीने सार्वजनिक बांधकाम विभाग काम करत आहेत.
शिवेंद्रराजे म्हणाले, दर्जेदार कामे होण्यासाठी सरकार लक्ष देत आहेत. कामाच्या दर्जा चांगला राहिला पाहिजे, गतीने झाली पाहिजे, यासाठी पीडब्ल्यूडीचे लक्ष आहे. वेळोवेळी त्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. कामाच्या दर्जाबाबत कोठेही तडजोड करायची नाही, याबाबत अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत. दर्जेदार कामे होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, काही मतदारसंघ दोन राज्यांच्या सीमेवर आहेत, त्यांच्या भागातील कामेही दर्जेदार केले जातील. जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. दरम्यान, 45 कोटी 35 लाख रुपये खर्चाच्या मागण्याही यावेळी मान्य करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे की, देशातील पायाभूत सुविधा चांगले, सक्षम असले तर आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाढते. आपली अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत गेली आहे. रस्ते, पूल कसे पाहिजे, याचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दाखवून दिले आहे. त्याच पध्दतीने राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग नियोजन करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कामांचे नियोजन करुन, शिस्त आणली जात आहे.