दैनिक स्थैर्य | दि. ०६ जानेवारी २०२४ | फलटण | आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटीचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. शांताराम आवटे यांनी डिजिटल मीडियाच्या विपरीत परिणामांवर भाष्य केले.
कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव आणि रामआदेशचे संपादक बापूराव जगताप यांनी पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे, पत्रकार सतीश कर्वे, संजय जामदार, महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे अध्यक्ष रविंद्र बर्गे, साहित्यिक प्रा. विक्रम आपटे, प्रा. मोनाली पाटील, मुख्याध्यापक भिवा जगताप, मनीष निंबाळकर उपस्थित होते.
प्रा. शांताराम आवटे यांनी त्यांच्या भाषणात डिजिटल मीडियाच्या अतिवापरामुळे समाजावर होणारे विपरीत परिणामांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “सद्या डिजिटल मीडियात त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा प्रसारित होत असल्याने समाज मनावर विपरीत परिणाम होत आहे. प्रिंट मीडिया विषयी विश्वासर्हता वाढली आहे, त्यामुळे सामान्य वाचक प्रिंट मीडियाकडे अधिक वळला आहे.”
प्रा. रमेश आढाव यांनी पत्रकारितेच्या विश्वासार्हता वाढविण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले, “समाजामध्ये चांगले आदर्श निर्माण व्हावेत, ध्येयवादी समाज निर्माण व्हावा यासाठी पत्रकार आणि वृत्तपत्रे कार्यरत असतात. त्याची मुहूर्तमेढ आचार्य जांभेकर यांनी रोवली आहे. पत्रकारितेची विश्वासार्हता वाढविण्याकडे, ती अधिक जबाबदारीने पार पाडण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हाच खरा या पत्रकारिता दिनाचा संदेश आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खरात यांनी केले, तर भिवा जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि आभार मानले.