दैनिक स्थैर्य | दि. ०२ जानेवारी २०२५ | फलटण | गेल्या १३ वर्षांपासून, ९ सर्कल, फडतरवाडी, तालुका फलटण येथील तत्त्वबोध विचार मंचाच्या वतीने आयोजित केली जात असलेली प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक जागर व्याख्यानमाला दि २७, २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी उत्साहात संपन्न झाली. ही व्याख्यानमाला समाजात विवेकसंपन्न नागरिक निर्माण करण्याच्या हेतूने आयोजित केली जाते, ज्यामुळे समाजात सांस्कृतिक आणि बौद्धिक जागरण होण्यास मदत होते.
दि २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता साखरवाडी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री तुळशीदास बागडे सरांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, कथाकथनकार आप्पासाहेब खोत यांचे रंगतदार कथाकथन झाले, ज्यामुळे श्रोत्यांची मने जिंकली गेली. त्यांनी सांगितलेली ‘कोंबडी’ ही कथा अस्सल ग्रामीण जीवनाचा बाज दाखवते आणि घरातील भांडणे उंबऱ्याच्या आतच असावीत हे आशयसूत्र विशेषतः महिलावर्गाला भावूक बनवून गेले.
दि २८ डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात मराठी चित्रपट ‘तेंडल्या’ चे प्रदर्शन झाले. दिग्दर्शक सचिन जाधव ह्यांनी उपस्थितांच्या प्रश्नांचे निरसन करून ‘तेंडल्या’ चित्रपटाच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि त्याचा आशय आबालवृद्धांना समजावून सांगितला. सायंकाळच्या सत्रात मुख्य व्याख्यान महाराष्ट्र टाईम्स चे जेष्ठ पत्रकार, लेखक डॉ मुकुंद कुळे यांचे ‘शोध हरवलेल्या लोकधारेचा’ हे अतिशय अभ्यासपूर्ण असल्याने उपस्थित श्रोत्यांसाठी पर्वणी ठरले. त्यांनी ग्रामीण संस्कृतीच्या समृद्ध वारस्याबद्दल आणि त्याचे संवर्धन कसे करावे ह्याबद्दल विस्ताराने सांगितले.
दि २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘तुळशी कट्टा’ हा कला-साहित्य संवर्धनाचा प्रयोग करणाऱ्या परेश-समीक्षा दाम्पत्यास ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेकजागर पुरस्कार २०२४’ चे वितरण जेष्ठ पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य मा. रविंद्र बेडकिहाळ यांचे हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. साखरवाडी परिसर १९३४ साली स्थापन झालेल्या साखर कारखान्याच्या वसाहतीच्या स्वरुपात सांस्कृतिकदृष्ट्या घडला असल्याचे दिसते आहे, आणि येथे चाललेल्या व्याख्यानमाला आणि गणेशोत्सव सारख्या कार्यक्रमांनी या परिसराची सांस्कृतिक वाटचाल समृद्ध केली आहे.
प्रमुख वक्ते जेष्ठ पत्रकार मा. रविंद्र बेडकिहाळ ह्यांनी ‘अभिजात मराठी आणि आपली जबाबदारी’ ह्या विषयावर साध्या-सोप्या मांडणीने ग्रामस्थांना संबोधित केले. त्यांनी वसाहतकाळात मराठी भाषिक अस्मितेसाठी झालेल्या जागरूकतेचा आणि स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे विस्ताराने वर्णन केले. यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रम आणि विषयांचे वैविध्य असल्याने ग्रामस्थांबरोबरच पंचक्रोशीतील हौशी, ज्ञानासक्त लोक मोठ्या प्रमाणात व्याख्यानमालेस उपस्थित राहिले. सोशल मीडियात प्रसारित झालेल्या कार्यक्रमाच्या माहितीमुळे उपस्थिती मंचास प्रेरक असल्याचे आणि आज आपल्यापुढे अत्यंत प्रतिकूल असा अविवेकी काळ उभा ठाकला असल्याने विवेकाचा जागर करण्याचे काम दुप्पट ताकदीने करण्यासाठी अजून दर्जेदार कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू असे मत तत्त्वबोध विचार मंच ९ सर्कल चे व्याख्यानमालेचे आयोजकांनी व्यक्त केले.