दैनिक स्थैर्य । दि.१७ नोव्हेंबर २०२१ । सातारा । मतदारांची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली असून या मतदार यादीत आपले नाव असल्याचे नागरिकांनी खात्री करुन घ्यावी. तसेच व्होटर हेल्पलाईन या ॲपचा वापर करुन युवकांनी मतदार यादीत नाव येण्यासाठी ॲपवर नाव नोंदणी करावी व मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देशपांडे बोलत होते. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी शेखर सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे आदी उपस्थित होते.
श्री. देशपांडे म्हणाले, मतदार नोंदणीसाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत मतदार यादीचे वाचन करण्यात आले. यामध्ये मयत, स्थलांतरीत मतदार यांची नावे वगळण्याबरोबर 18 वर्ष पूर्ण झालेल्या मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची कार्यवाही करण्यात आली. ज्यांचे 1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणार आहेत अशांना मतदानाचा हक्क प्राप्त व्हावा यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाच्या वतीने दरवर्षी विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. लोकसभा, विधानसभा बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी मतदार यादीत नाव नोंद झाल्याची खात्री करा.
नागरिकांनी व्होटर हेल्पलाईनचा जास्तीत जास्त वापर करुन आपले नाव मतदार यादीत असल्याची जबाबदार नागरिक म्हणून खात्री करावी. तसेच ॲपमध्ये नाव, जन्माची तारीख, मतदान केंद्र, याचीही तपासणी करावी, काही दुरुस्त्या असल्यास त्या ॲपवरच कराव्यात 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यामार्फत नवीन मतदारांचे अर्ज भरण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग, तृतीय पंथी यांच्यासाठीही विशेष मोहिम राबविण्याबरोबर युवकांचा मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग वाढावा यासाठीही महाविद्यालयींनस्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही श्री. देशपांडे यांनी यावेळी सांगितले.