
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाची लढत थेट दोन नाईक निंबाळकर घराण्यांमध्ये होत असल्याने ही निवडणूक राजे गटाच्या अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेचा (धनुष्यबाण) हाती घेऊन निवडणुकीच्या रणांगणात दमदार प्रवेश केला आहे. नाईक निंबाळकर घराण्याला असलेला ऐतिहासिक आणि राजकीय वारसा, तसेच जनमानसात असलेला आदर, याचा थेट फायदा श्रीमंत अनिकेतराजे यांना मिळू शकतो, असा स्पष्ट मतप्रवाह शहरात पहायला मिळत आहे.
श्रीमंत अनिकेतराजे यांच्या पाठीशी केवळ आमदार श्रीमंत रामराजे यांचेच नव्हे, तर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांसारख्या दिग्गज नेत्यांना मानणारा मोठा वर्ग उभा आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे ‘राजे गटा’साठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यामुळे ‘राजे गटा’चे सर्वच नेते या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद पणाला लावतील, यात शंका नाही. ही लढाई जिंकण्यासाठी ‘राजे गट’ आपली सर्व यंत्रणा आणि जुनेजाणते कार्यकर्ते सक्रिय करत आहे.
श्रीमंत अनिकेतराजे यांचा स्वतःचाही मोठा ‘फॅन फॉलोवर’ आहे. तरुण आणि उच्चशिक्षित असल्याने त्यांना आधुनिक विचारधारेचे नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे. ‘राजे गटा’चे संघटन, निष्ठावान कार्यकर्त्यांची साथ आणि श्रीमंत अनिकेतराजे यांचा आश्वासक चेहरा, ही त्यांची बलस्थाने आहेत. एका बाजूला पारंपारिक आणि जुन्या पिढीतील नेतृत्वाचा अनुभव, तर दुसऱ्या बाजूला नव्या युगाचा जोश आणि आधुनिक दृष्टिकोन, असा संगम त्यांच्या उमेदवारीमुळे झाला आहे.
एकंदरीत, नगराध्यक्षपदाच्या या प्रतिष्ठेच्या लढाईत श्रीमंत अनिकेतराजे यांचे आव्हान विरोधी उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यापेक्षा वरचढ ठरणार काय? हाच प्रश्न सध्या फलटणकरांच्या मनात आहे. ऐतिहासिक वारसा, दिग्गज नेत्यांचा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांची फौज घेऊन मैदानात उतरलेले युवराज श्रीमंत अनिकेतराजे फलटणच्या ‘गादी’वर आपला हक्क पुन्हा सिद्ध करतात की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

